हिंगोली: शहरालगत सुराना नगर भागामध्ये राज्य राखीव दलाच्या जवानाच्या घराचे कुलूप तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून तलवारीच्या धाकावर सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे तीन ते चार लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना रविवार, ७ मार्च रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी दरोडा टाकतांना परिसरातील घरांच्या बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोलीच्या राज्य राखीव दला मध्ये आर. व्ही. त्रिमुखे हे जवान कार्यरत आहेत. त्यांचे सुराणा नगर भागात घर असून या ठिकाणी त्यांचे आई-वडील पत्नी भाऊ आदी राहतात. जवान त्रिमुखे हे मागील काही दिवसांपासून कर्तव्यावर बाहेर जिल्ह्यात गेले आहेत.
दरम्यान, पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा दरोडेखोर या भागात आले. दरोडेखोरांनी त्रिमुखे यांच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी परिसरात असलेल्या वीस ते पंचवीस घरांना बाहेरून कड्या लावल्या. त्यानंतर त्रिमुखे यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून मधला दरवाजा तोडला व घरात प्रवेश केला. दरवाजा तोडण्याचा आवाजामुळे घरातली मंडळी जागी झाली. मात्र, एकाच वेळी सहा ते सात दरोडेखोरांनी तलवारी व कत्ती हातात घेऊन घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी त्रिमुखे यांच्या भावाचे हात बांधले. त्यानंतर त्यांचे आई-वडील, पत्नी व भाऊ यांच्या गळ्यावर तलवारी ठेवून आवाज करायचा नाही असा दम भरला. त्यानंतर महिलांच्या गळ्यावरील दागिने काढून घेतले. तसेच दरोडेखोरांनी घरातील दोन कपाट फोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम ताब्यात घेऊन जाताना सर्वां जवळील मोबाईल घेऊन पळ काढला.
दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेमुळे त्रिमुखे कुटुंबीय हादरून गेले. काही वेळानंतर त्यांनी शेजार्यांना आवाज दिला. त्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी एकत्र आले. भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या त्रिमुखे कुटुंबीयांना शेजारी राहणाऱ्या नागरिकांना धीर दिला. त्यानंतर या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, जमादार संतोष वाठोरे, अशोक धामणे, रविकांत हरकाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावर दरोडेखोरांचा रुमाल व चपला आढळून आल्यामुळे पोलिसांनी तातडीने श्वानपथकाला पाचारण केले आहे. तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले आहे. दरोडेखोरांच्या शोधासाठी जिल्हाभरात नाका-बंदी चे आदेश देण्यात आले आहेत. श्वान पथकाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग काढला मात्र पुढचा माग काढू शकला नाही.
बहुतांश दरोडेखोर पंचवीस वर्षे वयोगटातील: राज्य राखीव दलाचे जवान त्रिमुखे यांच्या घरात प्रवेश केलेले बहुतांश दरोडेखोर २२ ते २५ वर्षे वयोगटातील होते. जीन पॅन्ट व टी शर्ट घातलेले दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले होते त्यामुळे त्यांचे चेहरे स्पष्टपणे ओळखू आले नाही.