उस्मानपूरा पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह नातेवाईक व जमावाचे ठिय्या आंदोलन
औरंगाबाद: उस्मानपुरा भागात फिरोज खान या तरुणाचे सलून आहे. दुकान उघडण्यास परवानगी नसतांना त्याने आपले सलून उघडले होते. याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा त्यांनी फिरोज खान यांच्या दुकानावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
पोलिस स्टेशनमध्ये नेत असतांना रस्त्यातच खाली पडून फिरोज खानचा मृत्यू झाला. दरम्यान, सलून चालकाच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक आक्रमक झाले. ते सलून चालकाचा मृतदेह घेऊन उस्मानापूरा पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाले. तिथे त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. सलून व्यवसायिकाची हत्या करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी आणि उस्मानापूरा परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.
अखेर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. या प्रकरणातील संबंधित दोन पोलीस कर्मचारी आणि पोलीस निरीक्षकांना याबाबत कडक सूचना देण्यात आल्या. तसेच मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करु, असं आश्वासन आयुक्तांनी जमावाला दिला. त्यानंतर मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला.