छत्रपती संभाजीनगर: एप्रिल महिन्यात राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्ती यांची जयंती आहे. महापुरुषांनी समाज कार्याचा घालून दिलेला वारसा डोळ्यासमोर ठेऊन राज्याचा समाज कल्याण विभागाने राष्ट्रपुरुष/ थोर व्यक्तींना अभिनव पध्दतीने अभिवादन करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत १ एप्रिल २०२३ ते १ मे २०२३ या महिनाभराच्या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ देण्यासाठी ‘सामाजिक न्याय पर्व’ हा अभिनव उपक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.वाबळे, सहायक आयुक्त समाज कल्याण छत्रपती संभाजीनगर, यांनी केले तर सूत्रसंचलन श्री चव्हाण, तालुका समन्वयक यांनी केले. यावेळी उपस्थित श्रीमती जयश्री सोनकवडे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर, संजय दाणे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर, शिवराज केंद्रे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी श्रीमती जयश्री सोनकवडे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ. सुमंत भांगे आणि समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. या कालावधीत सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी देऊन योजनांची जनजागृती करणे, १ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष मोहीम चे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच महिनाभराच्या कालावधीत छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ देण्यासाठी ‘सामाजिक न्याय पर्व’ हा अभिनव उपक्रमाचे अभियान राबविण्यात येत असल्याचे श्रीमती जयश्री सोनकवडे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी यावेळी सांगितले.