नवी दिल्ली: संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीचा झालेला प्रसार आणि त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेवून सामाजिक जाणीव म्हणून प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रामध्ये एक रूपया प्रतिपॅड दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेनुसार देशभरातल्या 6300 जनौषधी केंद्रातून किमान दराने म्हणजे प्रतिपॅड एक रूपया दराने सॅनिटरी पॅड्सची विक्री केली जाते. वास्तविक बाजारभाव विचारात घेतला तर एका पॅडसाठी तीन ते आठ रूपये अशी वेगवेगळी किंमत मोजावी लागते.
जनौषधी केंद्रांच्या स्थापनेपासून म्हणजे 4 जून 2018 पासून ते 10 जून 2020 पर्यंत 4.61 कोटींपेक्षा जास्त सॅनिटरी नॅपकिन्सची विक्री या प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांमधून झाली आहे. या पॅडच्या किंमतीमध्ये 27 ऑगस्ट 2019 पासून बदल करण्यात आला. त्यानंतर 10 जून 2020 पर्यंत 3.43 कोटींपेक्षा जास्त सॅनिटरी नॅपकिन्सची विक्री प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांमधून झाली.
आपल्या देशामध्ये अनेक भागात महिलांना मासिक पाळीच्या काळामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक निर्बंधांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या काळात आवश्यक असणारी शारीरिक स्वच्छता पाळण्यात अनेक अडचणी येतात. देशातल्या अनेक भागात, विशेषतः ग्रामीण भागात महिला आणि युवतींना सॅनिटरी उत्पादने मिळू शकत नाहीत. या उत्पादनांची जास्त असलेली किंमत हेही त्यामागे एक कारण असते.
वंचित महिलांची होणारी अडचण आणि आर्थिक कारण लक्षात घेऊन सरकारने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘स्वच्छ, स्वस्थ आणि सुविधा’ सुनिश्चित करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार सर्वांना परवडणा-या आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी केंद्रीय औषधनिर्माण विभागाच्यावतीने सॅनिटरी नॅपकिन्सची विक्री प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांमधून केली जात आहे.
या केंद्रामार्फत विक्री करण्यात येणारे पॅड हे पर्यावरणाला अनुकूल आहेत. या पॅडसाठी वापरण्यात येणारे साहित्य हे जैव-विघटनशील आहे. हे साहित्य ‘एएसटीएम डी-6954’ मानकांचे पालन करतात. सध्या कोविड-19च्या कठीण काळामध्ये प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रे कार्यरत आहेत. ज्यांना औषधांची गरज आहे, त्यांना औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा निरंतर केला जात आहे. या सर्व जनौषधी केंद्रांमधून सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध आहेत. मार्च, एप्रिल आणि मे 2020 या महिन्यात देशभरामध्ये 1.42 कोटी पॅडची विक्री झाली. तसेच सर्व केंद्रांमध्ये सुविधा पॅडचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.