पुणे: उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या 14 शिष्यवृत्ती योजनांसाठी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे उच्च शिक्षण विभागाच्या 14 शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाईन अंमलबजावणी करण्यात येते. https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर या शिष्यवृत्तीबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना (कनिष्ठ स्तर) व (वरिष्ठ स्तर), राज्यशासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती, राज्यशासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, राज्यशासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग-2), माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य या योजनांचा समावेश आहे. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहनही डॉ. बोंदर यांनी केले आहे.