मुंबई: राज्यातील शाळा आणि
महाविद्यालये २३ नोव्हेंबर पासून सुरु करण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, हा निर्णय नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच असेल.
कोरोना संकटामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये अद्यापही बंद असून विद्यार्थी ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. दरम्यान, दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
मे महिन्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा व्हाव्यात यासाठी प्रयत्न असणार आहे. कारण पुन्हा निकाल येण्यास उशीर होईल आणि विद्यार्थ्यांचं पुढील वर्षी प्रवेश घेताना नुकसान होईल. आम्ही काल गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि मंत्रिमंडळात यासंबंधी कल्पना दिली आहे.
साधारणत: ही परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होते. पण सध्या तशी परिस्थिती नाही. त्यामुळे २३ तारखेपासून नववी, दहावी, अकरावी, बारावीच्या शाळा सुरु कराव्यात अशी विनंती केली आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
राज्यातील पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना १२ ते १६ नोव्हेंबर अशी फक्त पाच दिवस दिवाळी सणाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाईन अध्यापनही बंद राहील, असे शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे चालू शैक्षणिक वर्षांत शाळा सुरू करणे शक्य झाले नाही. परंतु १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले. प्रत्यक्ष शाळा सुरू न करता २२ जुलैपासून पूर्वप्राथमिक ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणास सुरुवात करण्यात आली.
शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्याबाबत शासनस्तरावर विचार सुरू होता. माध्यमिक शिक्षण संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षांतील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टय़ा ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, तसेच कामाचे एकूण दिवस २३० होणे आवश्यक आहे.
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे एकूण दिवस २०० व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे दिवस २२० होणे आवश्यक आहे.
शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने १२ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सणाची शाळा सुट्टी घोषित करण्यात येत आहे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या कालावधीत शाळांमार्फत ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असे जाहीर करण्यात आले आहे.