मुंबईः येत्या १ डिसेंबरपासून राज्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते चौथी आणि शहरी भागात इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असे गायकवाड म्हणाल्या.
लहान मुलांच्या शाळा पोषक आणि आरोग्यमय वातावरणात सुरू व्हाव्यात यासाठी पुढील ६ दिवस कोरोना प्रतिबंधक नियमांनुसार शाळास्तरावर सुरक्षेच्या सर्व बाबी तपासण्यावर भर दिला जाईल. कारण दीर्घकाळापासून वर्ग बंद अवस्थेत होते. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व पालकांसोबत सविस्तर चर्चा केली जाईल, असे गायकवाड म्हणाल्या.
मुलांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली जाईल. मुलांना एकत्र बसून शिक्षण घेण्याची आवश्यकता तज्ज्ञांकडून व्यक्ती केली गेली आहे. त्यानुसार चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. आगामी काळात या वर्गांसाठी लागू करावयाच्या नियमावलीबाबत टास्क फोर्ससोबत चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या पालकांशी, शिक्षकांशी चर्चा करून हानिर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.