अंबाजोगाई: महाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आणि युवा शिष्यवृत्ती निवड समितीच्या सदस्यपदी बीड जिल्ह्याचे सुपूत्र थोर संगीत कलासाधक पं.उध्दवबापू आपेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन आदेश नुकताच प्राप्त झाला आहे.
भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावाने दिल्या जाणार्या या पुरस्कार आणि शिष्यवृत्ती समितीला अनन्यसाधारण महत्व आहे. या समितीची पुनर्रचना नुकतीच करण्यात आली. सांस्कृतिक कार्यमंत्री समितीचे अध्यक्ष आहेत. तर राज्यमंत्री, सचिव सदस्य आणि संचालक सदस्य सचिव आहेत. त्याच बरोबर अशासकीय सदस्य म्हणून डॉ.आश्विनी भिडे देशपांडे, पं.उध्दवबापू आपेगावकर, श्रीनिवास जोशी, डॉ.राम देशपांडे, फैय्याज हुसेन खाँ साहेब यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे बीड जिल्ह्याच्या एका संगीत साधकाचा मोठा सन्मान झाला आहे. शासनाच्या वतीने पं.आपेगावकर यांचे अभिनंदन करण्यात आले. येत्या 25 जानेवारी रोजी या निवड समितीची पहिली बैठक होणार असून यामध्ये जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.