# ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचे कोरोनामुळे निधन.

मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीत ‘आशालता’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुणी ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (वय७९) यांचे कोरोनामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या साताऱ्याला आल्या होत्या. तेथेच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

सातारा जिल्ह्यात ‘देवमाणूस’, ‘आई माझी काळूबाई’ या मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. सध्या एका मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘आई माझी काळूबाई’ या अलका कुबल यांच्या मालिकेत आशालता यांची प्रमुख भूमिका आहे. या मालिकेचे चित्रीकरण फलटण, लोणंद, वाई या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. मालिकेतील एका गाण्यासाठी मुंबईहून एक डान्स ग्रुप आला होता. यातील सुमारे २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ते बाधित आढळल्यानंतर मालिकेचे चित्रीकरण थांबविण्यात आले. मात्र, आशालता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आशालता या मूळच्या गोव्याच्या असून, त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी मराठी आणि हिंदी अशा सुमारे १०० हून अधिक चित्रपटांमधून काम केले आहे. ‘गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, चिन्ना आणि महानंदा’ यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. तर बासू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. मराठीतील ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नव-याला, वहिनीची माया’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. संगीतावर आधारित ‘गर्द सभोवती’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे संगीताचे धडेही त्यांनी गिरवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *