ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन

पुणे: अनाथांची माय’  असा लौकिक मिळवलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे आज, मंगळवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना महिनाभरापूर्वी पुण्यातील गॅलेक्सी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ७५ वर्षांच्या होत्या. दरम्यान, सिंधुताई सपकाळ यांच्यावर उद्या बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुलांसाठी आपले आयुष्य झोकून दिले होते. त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून केंद्र सरकारच्या वतीने त्यांना २०२१ मध्ये पद्मश्री देऊन गौरवण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला.  

निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते हे त्यांना त्यांचे सासर आणि माहेरच्यांनीही हाकलून दिल्यानंतर स्वानुभवातून कळले होते. ते जगणे या अनाथ मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी अनाथ मुलामुलींचा सांभाळ करण्याचे ठरवले होते. महिलांवरील अन्याय- अत्याचाराला वाचा फोडण्याचे कामही त्यांनी केले. त्यांना आजपर्यंत १७२ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

..अनाथांची मातृदेवता हरपली ..!’ -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.

दीड वर्षांपूर्वी सिंधूताईनी स्वतः आपल्याशी दूरध्वनीवर बोलून विचारपूस केली होती आणि कोविडच्या लढ्यासाठी बळ दिलं होतं याची आठवण काढून मुख्यमंत्री म्हणतात की, महाराष्ट्राची मदर तेरेसा असं त्यांना संबोधलं जायचं ते अगदी बरोबर होतं. दुःख कुरवाळत बसू नका तर पुढे चालत रहा हे त्यांच्या जीवनाचं तत्व होतं. इतक्या खस्ता त्यांनी खाल्ल्या, कष्ट उपसले, समाजाकडून कायम दुस्वास होत होता, पण माईंनी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मिटू दिलं नाही. पद्मश्री सारखा महत्वाचा पुरस्कार मिळूनही त्या आपल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या होत्या की मला अजूनही अनेकांपर्यंत पोहचून त्यांना घास भरावयाचे आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे यापेक्षा काय उदाहरण असेल? त्या सदैव अनाथ, निराधारांच्या कल्याणाचा विचार करत असत. स्वतःच्या जीवनात आलेला दुःखाला बाजूला सारून त्यांनी अनेकांना आधार दिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा डोंगर उभा केला. या कामामुळेच अनेक मुली, महिला, निराधारांना आयुष्यात मायेची सावली मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *