# सातवे बौद्ध साहित्य संमेलन जानेवारीत नळदुर्ग येथे.

बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांची माहिती

अंबाजोगाई: सातवे बौद्ध साहित्य संमेलन नळदुर्ग (जि.उस्मानाबाद) येथे जानेवारी २०२२ मध्ये होणार आहे अशी माहिती बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी दिली आहे.

बौद्ध साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अंबाजोगाईत बौध्द साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी बौद्ध साहित्य संमेलन घेतले जाते. आतापर्यंत सहा संमेलने झाली असून महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत व सुप्रसिद्ध लेखक हे संमेलनाध्यक्ष राहिले आहेत.डॉ.आ.ह. साळुंखे, डॉ.यशवंत मनोहर, उत्तम कांबळे, डॉ.प्रदीप आगलावे, योगिराज वाघमारे आणि दत्ता भगत यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. सातवे बौद्ध साहित्य संमेलन नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे घेण्याची इच्छा परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारूती बनसोडे यांनी व्यक्त केली होती. बौद्ध साहित्य संमेलन घेण्याची कल्पना प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी मांडली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ती उचलून धरली बौद्ध हा शब्द केवळ धार्मिक नसून तो साहित्याच्या अनुषंगाने वापरला जातो बौद्ध साहित्य, पाली साहित्य हा शब्द जागतिक पातळीवर रूढ झाला आहे. तथागत भगवान बुद्धांनी आपल्या अनुयायांना तत्कालीन लोकभाषेत जो उपदेश केला तो त्रिपिटक या ग्रंथात एकत्रित करण्यात आला आहे. पाली, संस्कृत, इंग्रजी, हिंदी, सिंहली, चिनी आदी भाषेत हा ग्रंथ उपलब्ध आहे. बौद्ध साहित्याचा प्रभाव जागतिक वाड्मयावर असून भारतीय साहित्य आणि संस्कृतीवर तो ठळकपणे जाणवतो. या साहित्य संमेलनात बौद्ध साहित्य,संस्कृती आणि तत्वज्ञानावर चर्चा केली जाते. जानेवारी-२०२२ मध्ये हे संमेलन होणार असून लवकरच संमेलनाध्यक्षांची निवड केली जाईल अशी माहिती बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी दिली.

बैठकीस परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मारूती बनसोडे, डॉ.शंकर वाघमारे, डॉ.राहुल धाकडे, डॉ.अशोक डोळस, डॉ.सिद्धोधन कांबळे, डॉ.बाबासाहेब हिरवे, बलभीम तरकसे आदींसह परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *