# शमीम अली यांना आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार जाहीर.

 

अंबाजोगाई: आंतरभारतीच्या वतीने दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार या वर्षी सिमेंटच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या शमीम मारुफ अली यांना दिला जाणार आहे.

अन्य प्रांतातून येऊन अंबाजोगाईत स्थायिक झालेल्या व आंबाजोगाईच्या गौरवात भर टाकणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. प्राचार्य डॉ. बाबू खडकभावी यांना पहिला पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर मनीष स्वीट होमचे रुपडा, प्राचार्य डॉ. महावीर शेट्टी, उडपी हॉटेलचे शंकर मेहता, बालाजी केस कर्तनालयाचे आनंद अंकाम व गतवर्षी उडपी रेस्टॉरंटच्या श्रीमती सुशीला शेट्टी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

या वर्षीचे सत्कारमूर्ती शमीम मारुफ अली हे मुळचे उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातले राहणारे आहेत. पंधरा वर्षापूर्वी ते महाराष्ट्रात आले. सात वर्षे मोठ्या भावासोबत लातूरला काढल्यानंतर ते ७-८ वर्षांपूर्वी आंबाजोगाईला आले. लातूर रोडवर साखर कारखान्याच्या पुढे त्यांनी सिमेंटच्या विविध वस्तू बनवण्याचा प्रकल्प सुरू केला. विशेष म्हणजे पोलियोमुळे लहानपणापासून ते दोन्ही पायांनी अधू आहेत.

हजारो मैल दूर येऊन एक दिव्यांग व्यक्ती एक प्रकल्प उभा करतो, याचे कोणीही कौतुकच करेल. अशा व्यक्तीला ‘स्नेहसंवर्धन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याचा निर्णय अंबाजोगाईच्या आंतरभारतीने घेतला आहे, अशी माहिती आंतरभारतीचे राष्ट्रीय सचिव अमर हबीब, स्थानिक शाखेच्या अध्यक्ष डॉ. अलका वालचाळे, उपाध्यक्ष दत्ता वालेकर, सचिव वैजनाथ शेंगुळे व या कार्यक्रमाच्या संयोजक अॅड. कल्याणी विर्धे यांनी दिली.
हा पुरस्कार 15 ऑगस्ट रोजी वितरण करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *