श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे “जीवनगौरव पुरस्कार” जाहीर; १७ सप्टेंबर रोजी वितरण

अंबाजोगाई: अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून अंबाजोगाई शहराच्या सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक जडणघडनीत भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा द्वितीय “जीवनगौरव पुरस्कार” प्रदान सोहळ्याचे आयोजन रविवार, १७ सप्टेंबर २०२३ रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, या दिवशी सायंकाळी सहा वाजता  न्यू व्हिजन पब्लिक  स्कुल, मोदी लर्निंग सेंटर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

आपल्या मातीशी नाळ जोडून आपल्या मातृभूमीशी कृतज्ञ असणारे विविध मान्यवरांना  संस्थेच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. २०२३ च्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी हे आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रासाठी वाहून दिलेले प्रा. नानासाहेब गाठाळ, सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने आपला वेगळा ठसा उमटवनारे अलहाज शेख मोहम्मद अब्दुल हकीम, प्रा.बाळकृष्ण गोपाळराव कुलकर्णी (बी. जी. कुलकर्णी), त्याचबरोबर कला व सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवत कलाक्षेत्रात आपले भरीव योगदान देणारे त्रिंबकजी पोखरकर हे  ठरले आहेत .

या  पुरस्काराचे यंदा द्वितीय वर्ष असून पहिल्या वर्षी म्हणजे च २०२२ साली “जीवनगौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात आलेल्या मान्यवारांमध्ये श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेला उंच शिखरावर घेऊन जाणारे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाले, शैक्षणिक क्षेत्रात आपले भरीव योगदान देणारे प्राचार्य डॉ. दामोदर थोरात, सामाजिक व सांस्कृतिक तसेच आरोग्य क्षेत्रातील योगदानाबाबत डॉ. पांडुरंग पवार, तसेच प्रतिष्ठित व्यापारी गौतमचंद सोळंकी आणि ज्येष्ठ समाजसेवक मौलाना मोहम्मद रमजान छोटू पटेल यांना जीवन गौरव हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र अशा स्वरूपात असणार आहे.

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जानाऱ्या द्वियीय जीवनगौरव पुरस्कार प्राप्त मान्यवरातील प्रा. नानासाहेब गाठाळ यांनी जिल्हा परिषद शिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरू झाली होती. कालांतराने ते श्री योगेश्वरी विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांच्या शिक्षणाचा अनुभव व विद्यार्थ्यांप्रति जिव्हाळा पाहता त्यांना स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आले. श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र या विषयात हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात विद्यार्थ्यांना विविध उच्च पदावर पोचण्यास मोलाचे मार्गदर्शन केले आहे. तसेच दैनिक विवेकसिंधु या वर्तमान पत्राच्या माध्यमातून एक पत्रकार ते संपादक म्हणून त्यांचा प्रवास देखील वाखाणण्याजोगा असाच होता. त्यांची ओळख एक निर्भीड व निरपेक्ष पत्रकार तथा संपादक म्हणून झाली आहे. याकाळात त्यांनी अंबाजोगाई शहर तथा तालुक्यातील सामाजिक , शैक्षणिक तसेच राजकीय प्रश्नांना वाचा फोडली आहे.  आपल्या विवेकसिंधु या वर्तमान पत्रातुन वेळोवेळी प्रा.नानासाहेब गाठाळ यांनी अनेक गरीब, होतकरू व गरजवंत विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

आपली संपूर्ण हयात आपल्या समाजातील अडलेल्या नडलेल्या निराधार, होतकरू व गरजवंत महिला, मुली, तसेच विधवा व परितक्त्या यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे अलहाज शेख मोहम्मद अब्दुल हकीम. त्यांनी जवळपास ३०० च्या वर मुलींच्या लग्नासाठी त्यांनी आर्थिक मदत केली असून तशी मदत आजही त्यांच्याकडून चालूच आहे. कोव्हिड काळात १०००च्या वर अन्नधान्याच्या किटचे वाटप मोहंमद अब्दुल हकीम यांनी केले आहे. मुस्लिम समाजातील पवित्र अशा रमजान महिन्यात मोफत ईदला लागणारे साहित्य वाटप करतात. मागील वीस वर्षा पासून ते सर्व धर्मातील मुलींना मोफत शिलाई मशीन, टायपिंग तसेच संगणकाचे प्रशिक्षित देत आहेत. एवढे मोठे सामाजिक कार्य असून देखील ते कधी प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत.

तिसरे पुरस्कार प्राप्त मान्यवर प्रा.बाळकृष्ण गोपाळराव कुलकर्णी (बी. जी. कुलकर्णी)  यांनी देखील आपले संपूर्ण आयुष्य श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेतच खर्च केले.  योगेश्वरी माध्यमिक विद्यालयात त्यांनी शिक्षक म्हणून ज्ञानार्जनास सुरुवात केली. पुढे त्यांनी जालना येथून एमएससी इलेक्ट्रॉनिक्स हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून १९७७ साली श्री योगेश्वरी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.  त्यांनी योगेश्वरी महाविद्यालयातुन  भौतिक शास्त्र (फिजिक्स)व इलेक्ट्रॉनिक्स या दोन विषयात अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करून अनेक नामांकित डॉक्टर इंजिनिअर निर्माण करण्यासाठी आपले मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या विषयात अनेक विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण  मिळवून दिले आहेत. ATS मुंबई चे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी हे त्यांचे अत्यंत आवडते विद्यार्थी होते. त्यांची ओळख ही एक विद्यार्थी प्रिय, व्यासांगी, आपल्या विषयावर पकड असलेले शिक्षक म्हणून निर्माण झाली होती. २९ वर्षांची प्रदीर्घ सेवा देऊन श्री योगेश्वरी महाविद्यालयातुन प्रा. बाळकृष्ण गोपाळराव कुलकर्णी हे २००६ साली सेवानिवृत्त झाले.

चौथे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेले कला क्षेत्रात भरीव असे योगदान देणारे त्रिंबकजी पोखरकर हे आहेत. पोखरकर यांनी कागद, काड्या व अन्य टाकाऊ साहित्य वापरून अनेक कलाकृती तयार केल्या आहेत.  त्यांनी तयार केलेल्या विविध कलाकृतीचे राज्यात प्रसिद्ध असलेल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दोनवेळा प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात राज्यातील अनेक कलाप्रेमींकडून त्यांचे कौतुक करतांना त्यांनी तयार केलेल्या  कलाकृतीने अनेकांना भुरळ घातली आहे .

अशा या थोर महान विभूतींचा शिलेदारांचा श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सम्मान करण्यात येणार असल्याचे संस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी व संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी यांनी जाहीर केले आहे. श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे वतीने मागील अनेक वर्षांपासून अपंग व मतिमंद विद्यालय, जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालय तथा महाविद्यालय, घाटनागनाथ विद्यालय, न्यू व्हिजन सीबीएसई पब्लिक स्कुल, डीएड व बीएड महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, बीसीए व बीबीए महाविद्यालय कार्यरत असून संस्थेच्या वतीने मुलींना मोफत टायपिंग त्याचबरोबर संगणकाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *