# अंबाजोगाईत एकाच वेळी ३० मृतदेहांवर अंत्यसंस्कार.

भय इथले संपत नाही: दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा संसर्ग

अंबाजोगाई: बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला असून विशेषतः संसर्गाचा अधिक प्रादुर्भाव आहे. वाढत्या रूग्ण संख्येसोबतच मृतांची संख्याही वाढत असल्याने भयावह परिस्थिती आहे. शनिवार व रविवार या दोनच दिवसांत अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या ३० रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. २८ जणांना अग्नीडाग तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला.

दिवसेंदिवस कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालल्याने भय इथले संपत नाही, अशीच परस्थिती सध्या निर्माण झाली आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे. बीड जिल्ह्यात दररोज हजारांपेक्षाही अधिक नवीन रूग्ण आढळून येत आहेत. अंबाजोगाई तालुक्यात फक्त एप्रिल महिन्यात चार हजारांपेक्षा जास्त रूग्ण निष्पन्न झाले आहेत. तर दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये मिळून हजार पेक्षाही अधिक कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर शेकडो रूग्ण हे गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रूग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र दिलासादायक असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे. शनिवार आणि रविवार असे दोनच दिवसांत एकूण ३० मृतदेहांवर अंबाजोगाई नगर पालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. यात २ पार्थिवांचे दफन तर २८ पार्थिवावर दहन विधी करण्यात आले. आजूबाजूच्या तालुक्यातील रूग्णांचा ओढा अंबाजोगाईकडे शेजारच्या सर्व तालुक्यातून रुग्ण अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीचे कोविड सेंटर मध्ये दाखल होत आहेत. ही दोन्ही ठिकाणे कोविड रूग्णांनी खचाखच भरली आहेत. दरम्यान, या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराची जबाबदारी अंबाजोगाई नगर पालिकेची आहे. रविवारी अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेले मृत रूग्ण हे एकट्या अंबाजोगाई तालुक्यातील नसून त्यापैकी अनेकजण हे आसपासच्या तालुक्यातील रहिवासी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *