डोक्यातून दोन गोळ्या आरपार; वैद्यकीय वर्तुळात खळबळ
सोलापूर: राज्यभरातील हजारो रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेले आणि मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांत पारंगत असलेले सोलापूरचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रचंड संपत्ती, समाजात प्रतिष्ठा आणि वैद्यकीय क्षेत्रात बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाणारे डॉ. वळसंगकर यांची ही आत्महत्या सर्वांनाच हादरवून टाकणारी ठरली आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
डॉ. वळसंगकर यांच्या नावावर राज्यातील अनेक रुग्णालयांतून रुग्ण पाठवले जात असत. त्यांच्याकडे ऑपरेशनसाठी महिनो न महिने प्रतीक्षा यादीत रुग्ण राहात असत. वैद्यकीय सेवेमुळे त्यांना “सोलापूरचे भूषण” असेही संबोधले जात होते.
आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉक्टर वळसंगकर हे आपल्या शांत, संयमी स्वभावामुळे ओळखले जात होते.
तणावाच्या वाढत्या समस्येवर गंभीर प्रश्न उपस्थित
ही आत्महत्या केवळ एका डॉक्टरची नाही, तर समाजातील मानसिक तणावाच्या वाढत्या समस्येवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना ठरत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी लातूर मनपाचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी देखील अशाच पद्धतीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोहरे यांच्यावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.