पुणे: लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या निवारागृहात असलेल्या उत्तरप्रदेशातील 1 हजार 131 नागरिकांना घेऊन पुणे स्टेशन ते लखनऊ (उत्तर प्रदेश) विशेष रेल्वे आज शनिवारी रात्री रवाना झाली, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, प्रेम वाघमारे यांच्यासह रेल्वे तसेच आरोग्य, पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पुणे जिल्हा प्रशासनाकडून या प्रवाशांसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रवाशांसाठी बसण्याची चोख व्यवस्था केली होती. या ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात येत होती.
रेल्वेमधून पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. याशिवाय सोबत खाद्यपदार्थही देण्यात आले होते. राज्यशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम व उत्तर प्रदेश प्रशासनाच्या समन्वयातून पुणे जिल्ह्यातून उत्तर प्रदेशात सोडण्यात आलेली ही पहिलीच रेल्वे आहे.