# अंबाजोगाईतील कोरोना विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा येत्या चार दिवसात होणार कार्यान्वीत.

 

अंबाजोगाई:  येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत परदेशातून येणाऱ्या १५ अत्याधुनिक व भारतीय बनावटीच्या लहानमोठ्या जवळपास ७० मशनरी दाखल झाल्या आहेत. या सर्व मशनरींच्या इन्स्टॉलेशनचे काम पूर्ण झाले आहे. येत्या चार दिवसात या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूसह इतर महत्वाच्या विषाणू तपासणीस प्रारंभ होणार आहे.

मार्च महिन्याच्या प्रारंभी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत गेल्यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या वतीने येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात “विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा” निर्मितीला मान्यता देण्यात आली होती. या मान्यतेनंतर हाफकीन संस्थेच्या वतीने या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असणाऱ्या इलिसा प्लेट वॉशर, रेफ्रिजरेटर मायक्रोफग मोडल, व्हर्टीकल अल्ट्रा डीप फ्रिजर, इलिसा प्लेट रिडर मोडल, व्हर्टीकल डीप फ्रिजर २० डिग्री सी, इलिसा प्लेट वॉशर मोडल, रेफ्रिजरेटर हायस्पीड सेंट्रीफ्युग मोडल थर्मो एसटी 16 आर आदी सुमारे १ कोटी ५ लाख रुपयांच्या अत्याधुनिक मशनरी. तसेच जिल्हा विकास यंत्रणा (डिपीडिसी) फंडातून १ कोटी २१ लाख रुपयांच्या भारतीय बनावटीच्या लहानमोठ्या जवळपास ७० मशनरी या प्रयोगशाळेत दाखल झाल्या आहेत. या मशनरी इन्स्टॉलेशनचे काम पूर्ण झाले आहे.

या मशनरीच्या इन्स्टॉलेशन पूर्णत्वाचा अहवाल नागपूर येथील आँल इ़डिया इन्स्टिट्युट मेडिकल सायन्स या संस्थेकडे पाठवण्यात आला असून या प्रयोगशाळेत सदरील संस्थेकडून पाठवण्यात आलेल्या विषाणूची तपासणी करुन त्याचा रिपोर्ट नागपूर येथील संस्थेच्या अहवालास मँच झाल्यानंतर ही प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान फरिषदेच्या (आयसीएमआर) रितसर परवानगीनंतर या अत्याधुनिक प्रयोगशाळेत विषाणू तपासणीस सुरुवात होणार आहे.

प्रयोगशाळा २४ तास सुरू ठेवण्याचे नियोजन:

या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत विभाग प्रमुखांसह ९ डॉक्टर, ८ टेक्निशियन, ६ सहायक तंत्रज्ञ आणि ८ शिपाई कार्यरत राहणार आहेत. भविष्यात या प्रयोगशाळेचा लोड वाढला तर ही प्रयोगशाळा २४ तास सुरू ठेवण्याचे नियोजनही वैद्यकीय महाविद्यालयाने केले आहे अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमीत देशमुख, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. टी. पी. लहाने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *