तूर्तास खाजगीकरण नाही, तो एक पर्याय
मुंबई: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. तर दुसरीकडे एसटी महामंडळाचे खासगीकरण होणार असल्याची माहिती समोर आली होती. यावर स्पष्टीकरण देत परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, शासनाकडून असा अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. शासनाला वेठीस धरुन प्रश्न सुटणार नाहीत. राज्य महामंडळ आणि कर्मचाऱ्यांचे यात नुकसान होत आहे. संप मागे घेऊन कर्मचाऱ्यांनी शासनासोबत चर्चा करावी, असे आवाहन अनिल परब यांनी आज केले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी उत्पन्न वाढीसाठी, खर्च कसा कमी करता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. वेगवेगळ्या पर्यायांपैकी खाजगीकरण देखील आहे. मात्र, एसटीच्या खाजगीकरणाबाबत अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. कामगार अद्यापही त्यांच्या भूमिकेवर अडून बसले आहेत. कामगारांप्रमाणेच लोकांच्या दायित्वाची जबाबदारी सरकारची असून शासन त्या पर्यायांचा विचार करत आहे. संप मागे घेण्यासाठी दररोज आवाहन करत आहोत. तरीही कामगार मागणींवर ठाम आहेत, असेही मंत्री परब यांनी सांगितले.