# पत्रकारांना कोरोना योध्दा दर्जा आणि विमा देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक -राजेश टोपे.

पुणे: राज्यातील सर्वच पत्रकार कोरोना संदर्भात जनजागृती करून सर्व सामान्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहचविण्याचे काम आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत. त्यामुळे पत्रकारांना कोरोना योध्दा श्रेणीमध्ये ग्राह्य धरण्याबाबत, येत्या अधिवेशनात आणि कॅबिनेटमध्ये सकारात्मक निर्णय करू, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

पुणे येथे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आश्वासन दिले. पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली संघाचे पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

कोरोनाच्या युद्धात डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्याबरोबर पत्रकार ही मागे नाहीत. त्यामुळे त्यांना कोरोना योद्धा गृहित धरून 50 लाखांचे विमा कवच जाहीर करावे आणि तसा शासन आदेश तत्काळ निर्गमित करावा. तसेच पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना तातडीने 50 लाखांची मदत द्यावी, त्याचबरोबर जे माध्यमकर्मी, पत्रकार कोरोनाबाधित होतील त्यांच्यासाठी रुग्णालयात तातडीने बेड उपलब्ध करून मोफत उपचार करावेत आणि त्याबाबतचे तातडीने शासन आदेश काढावेत, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *