# मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारची याचिका सदोष.

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा आरोप

पुणे: मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने सदोष याचिका दाखल केली असून, राज्य सरकार मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहे, असा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी शुक्रवारी केला.

मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भात पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव करत राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेसाठी निधी मंजूर केला. मात्र, हा निधी अपुरा असून, त्याचा विनिमय कसा करणार, याबाबत स्पष्टता नाही. राज्य सरकारच्या २८ जुलै २०२० च्या परिपत्रकातून मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून वगळण्यात आले आहे. वारंवार मागणी करूनही हे परिपत्रक अद्याप रद्द केले नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेला लाभ एसईबीसी प्रवर्गाला देण्यात येईल, हे शासनाचे विधान चुकीचे व दिशाभूल करणारे आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पुण्यात ३ ऑक्टोबर रोजी विचार मंथन बैठक:  मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात एकसूत्रता यावी, यासाठी शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी पुण्यात विचार मंथर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये समाजातील माजी न्यायमूर्ती, विचारवंत, संघटनांचे प्रतिनिधी, आरक्षण विषयातील तज्ज्ञ सहभागी होतील, असेही मेटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *