# आरक्षण धोरणविरोधी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा.

निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे; पदोन्नतीतील आरक्षणासाठी पुण्यात 26 जून रोजी मोर्चा

पुणे: पदोन्नतीतील आरक्षणाच्या संदर्भात येत्या 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी पुण्यामध्ये विविध मागासवर्गीय संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे आरक्षण हक्क कृती समितीच्या शनिवार, 12 जून रोजी झालेल्या बैठकीत ठरले. दरम्यान, आरक्षण धोरण विरोधात भूमिका घेणाऱ्या दोषी अधिऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घ्यावी, असे मत संविधान फाऊंडेशनचे प्रमुख तथा आरक्षण हक्क कृती समितीचे विशेष निमंत्रित निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी यावेळी व्यक्त केले.

आरक्षण हक्क कृती समितीची पुणे विभागाची बैठक संविधान फाऊंडेशनचे प्रमुख तथा आरक्षण हक्क कृती समितीचे विशेष निमंत्रित निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला पुणे विभागातील विविध मागासवर्गीय संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये बिसेफचे सुनील निरभवणे, कॅनरा बँक कर्मचारी असोसिएशनचे शरद कांबळे, आरक्षण हक्क समिती मुंबईचे सिद्धार्थ कांबळे, अधीक्षक अभियंता महेंद्र वानखेडे, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे, अनुसूचित जाती -जमाती संघटनांच्या अखिल भारतीय  परिसंघाचे डॉ. संजय कांबळे बापेरकर, बानाईचे पांडुरंग शेलार उद्योजक अविनाश कांबळे, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे डॉ. बबन जोगदंड, रिपब्लिकन कर्मचारी फेडरेशनचे विनोद चांदमरे, कास्ट्राईबचे मिलिंद रणपिसे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी ई. झेड. खोब्रागडे म्हणाले, आरक्षणाचा लढा अधिक व्यापक करून आमदार-खासदार यांच्या भेटी घेऊन त्यांच्यामार्फत तारांकित प्रश्न विधिमंडळात मांडण्याची आवश्यकता असल्याचे सांगून आरक्षण धोरण विरोधातील अधिकारी यांचे विरुद्ध जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घ्यावी लागेल असेही सूचित केले. शासन कंत्राटीकरण, खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा डाव खेळत आहे.यालाही विरोध करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आरक्षणाबरोबरच संरक्षण आणि विकास असे इतरही सामाजिक प्रश्नी समाजातील लोकांना जागृत करण्याचा कार्यक्रम कृती समितीने राबवावा असे आवाहनही त्यांनी केले.

26 जूनच्या आंदोलनाला सर्व राजकीय संघटना, महिला, युवक, महिला, बचत, गावपातळीवर काम करणारे कर्मचारी यांचा सहभाग व त्यातून मास बेस आंदोलन समाज हितासाठी, बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीच्या साठी मजबूत करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

या बैठकीत सरकारची आरक्षण विरोधी भूमिका ही घातक असून मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना सरकार जाणून-बुजून पदोन्नती नाकारत आहे, यामुळे राज्यभरातील 70 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत. यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्णय आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने घेण्यात आला.

या बैठकीत कृती समितीचे पदाधिकारी सिद्धार्थ कांबळे यांनी प्रास्ताविकात हे आंदोलन अधिकारी- कर्मचाऱ्यां पुरते सीमित न राहता या आंदोलनामध्ये सर्व मागासवर्गीय समाजाच्या लोकांनी आपल्या कुटुंबीयांसह सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

सुनील निरभवणे यांनी महाराष्ट्रामध्ये 26 जून रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये अधिकारी-कर्मचारी यांच्याबरोबरच विद्यार्थी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होतील. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी इंजि. महेंद्र वानखेडे,पांडूरंग शेलार, विनोद चांदमारे, शरद कांबळे,सुभाष मराठे,डॉ.संजय कांबळे यांनीही आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बबन जोगदंड यांनी केले. या बैठकीला अधीक्षक अभियंता पुंडलिक थोटवे, राजेश साबळे, स्वप्निल श्यामकुवर, संजय पिंपोडकर, उत्कर्षा शेळके, ज्योती सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी शरद कांबळे, विजय कांबळे, राम सर्वगोड, दिलीप लोखंडे, हरीश गायकवाड, विजय कांबळे, पंडित त्रिभुवन, निलेखा तोटे, गोवर्धन सोनवणे, श्रीमंत लोखंडे, बाबासाहेब अंबुरे, लक्ष्मण मुदळे, मिलिंद रणपिसे, मोहन सुखदेव, जनार्दन लोंढे यांच्यासह संघटनांचे मुंबई, अहमदनगर, सोलापूर,सातारा येथील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *