मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाव्दारे विविध सामाजिक घटकांना (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पत्रकार, तसेच विविध पुरस्कारार्थी) स्मार्टकार्ड देण्यात येते. सद्यस्थितीत स्मार्टकार्ड कार्यप्रणालीच्या काही तांत्रिक अडचणींमुळे स्मार्टकार्ड नोंदणीकरण प्रक्रिया बंद असून केवळ स्मार्टकार्ड नुतनीकरण व स्मार्टकार्ड टॉपअप प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची तसेच इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी “स्मार्ट कार्ड” योजनेच्या नोंदणीकरण व वितरणासाठी ३१ मार्च, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाडयामध्ये सवलत देत आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेली “स्मार्ट कार्ड” काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु, सद्यस्थितीत स्मार्टकार्ड कार्यप्रणालीच्या काही तांत्रिक अडचणींमुळे स्मार्टकार्ड नोंदणीकरण प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे स्मार्टकार्ड नोंदणीकरण व वितरण करण्याकरिता ३१ मार्च, २०२३ पर्यंत मुदत वाढ देण्यात येणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.