# विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे -कुलगुरु डॉ.प्रमोद येवले.

कुलगुरूंनी साधला विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद; २५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

औरंगाबाद: दरवर्षीच्या तुलनेत यंदाची परीक्षा सर्वांसाठीच जिकरीची असली तरी कोणीही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे. असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी बुधवारी (दि.सात) परीक्षेसंदर्भात ‘ऑनलाईन‘ संवाद साधला. विद्यापीठाच्या फेसबुक पेजवर सकाळी ११ ते १२ या दरम्यान हा लाइव्ह संवाद साधला. ‘कोविड-१९ नंतर’चे शिक्षण, परीक्षा पॅटर्न याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या संवादात विद्यार्थी शिक्षक-पालक शिक्षणप्रेमी अशा सुमारे २५ हजाराहून अधिक जणांनी सहभाग नोंदविला.

यावेळी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले म्हणाले, विद्यापीठ अनुदान आयोग, माननीय कुलपती व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार परीक्षा पद्धती राबविण्यात येणार आहे. कोणीही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये तसेच विद्यार्थ्यांना घरी बसूनच ही परीक्षा देता यावी या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. आपल्या विद्यापीठाने परीक्षा मंडळ, विद्या परिषद व व्यवस्थापन परिषदेची बैठक घेऊन याबद्दल पुढील दिशा ठरवली आहे. सर्व सन्माननीय सदस्यांनी सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून यास तत्काळ मान्यता दिली. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल ऑनलाइन ऑफलाईन दोन्हीपैकी एक मोड स्वीकारता येईल. ९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान परीक्षा होऊन दिवाळीपूर्वी निकाल लावण्यात येणार आहे. तसेच पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने तासिकाना लगेच सुरुवात होणार आहे. विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक कारणांमुळे आॅनलाईन परीक्षा देता येणार नाहीत, त्यांच्यासाठी आॅफलाईन पध्दतीचा पर्यायही आहे. विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घरी बसून आॅनलाईन पध्दतीने देता येणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांनी आॅनलाईन परीक्षा घेण्यासाठी सहमती दर्शवली आहे. मोबाईल, लॅपटॉप, संगणकाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. ज्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांना जवळच्या महाविद्यालयात जाऊन परीक्षा देता येईल. जर महाविद्यालय दूर असेल तर एमकेसीएलच्या प्रशिक्षण केंद्रात जाऊन परीक्षा देता येईल. सर्व प्रयत्न करूनही आॅनलाईन सुविधा न मिळाल्यास त्या विद्यार्थ्यांना ओएमआर पध्दतीने जवळच्या संलग्नीत महाविद्यालय, एमकेसीएल केंद्रात जाऊन परीक्षा देता येईल. एक तासांमध्ये ५० गुणांची परीक्षा होणार आहे. विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक व अधिकार मंडळाचे सदस्य परीक्षेसंदर्भात सहकार्य करीत आहेत, असेही कुलगुरु म्हणाले. जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संवादात सहभागी विद्यार्थी शिक्षकांच्या शंकांचे निरसन यावेळी कुलगुरूंनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *