दहावी, बारावीची परीक्षा मे महिन्यात
मुंबई: ऑनलाईन शिक्षणातून शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांना आता 5 ऐवजी 14 दिवसांची दिवाळीची सुट्टी देण्यात आली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने परिपत्रक काढले आहे. दरम्यान, मे महिन्यात 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा व्हाव्यात यासाठी प्रयत्न असणार आहे. कारण पुन्हा निकाल येण्यास उशीर होईल आणि विद्यार्थ्यांचं पुढील वर्षी प्रवेश घेताना नुकसान होणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
7 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान दिवाळीची सुट्टी मिळणार. शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर परिपत्रकात बदल करून 5 ऐवजी 14 दिवस दिवाळीची सुट्टी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. कोरोना काळात शाळा सुरू नव्हत्या. पण ऑनलाईन वर्ग चालू होते. शिक्षकांना या ऑनलाइन वर्गांबरोबरच कोरोना च्या कामांची अतिरिक्त जबाबदारीही होती. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर सुटीचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती लक्षात घेता यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नसल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्याचे महिने आहेत. त्यामुळे आम्ही मे महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सप्टेंबर म्हटले की निकाल येण्यास उशीर होईल आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत आणि दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत प्रस्ताव ठेवला आहे. मंत्रिमंडळ बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार आहेत, असेही गायकवाड यांनी सांगितले.