औरंगाबाद: जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक ते बी-बियाणे, खतांसह सर्व सुविधा सुलभतेने उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेत बी-बियाणे, खताच्या विक्री प्रक्रियेचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज गुरूवारी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना विविध निर्देश दिले. बैठकीस राज्य फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके यांच्यासह खा. इम्तियाज जलील, खा. भागवत कराड, आमदार हरीभाऊ बागडे, प्रदिप जैस्वाल, संजय शिरसाठ, सतीश चव्हाण, अतुल सावे, प्रशांत बंब, नारायण कुचे, विक्रम काळे, अंबादास दानवे, उदयसिंग राजपूत, प्रा.रमेश बोरणारे यांच्यासह जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांच्यासह इतर मान्यवर, संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पाश्वभूमीवर इतर जिल्हास्तरीय अधिकारी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
पालकमंत्री यावेळी म्हणाले, यावर्षी चांगले पर्जन्यमान असण्याचा अंदाज वर्तवला जात असून शेतकरी बांधवांसाठी ही चांगली बाब आहे. त्या पाश्वर्भूमीवर खरीप हंगामासाठी कृषी विभागाने खत, बी-बियाणे यांचा पुरेसा साठा शेतकर्याना उपलब्ध करुन द्यावा. दुकानदारांकडून कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांची लूट होणार नाही याची काळजी घ्यावी. विनागर्दी शेतकऱ्यांना गरजेच्या गोष्टी उपलब्ध होण्यासाठी तसेच पीक पेरणीसाठी सर्व आवश्यक ते सहकार्य करुन खरीप हंगामात शेतकर्यांनी उत्साहाने सहभागी होण्यासाठी यंत्रणांनी प्रभावी नियोजन करावे. शेतकर्यांना नवीन कर्जासाठी आधी घेतलेल्या कर्जातील बाकी राहिलेल्या परतफेडीमुळे कुठल्याही प्रकारची अडवणूक होणार नाही यासाठी विशेषत्वाने खबरदारी घ्यावी. कापूस खरेदी प्रक्रिया जिल्ह्यात सुरु झाली असून ती गतिमान करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधितांना दिले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वीज जोडणीच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या दृष्टीने ऊर्जामंत्र्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, पोकरा योजनेंतर्गत अधिक शेतकर्यांनी लाभ देण्यासाठी योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी देखील पाठपुरावा करण्यात येईल. लोकप्रतिनिधीं दिलेल्या विविध सूचनांची योग्य ती दखल घेत शेतकर्यांना अधिक सुरक्षित करण्यासाठी भरीव उपाययोजना राबवण्यात येईल. या अडचणीच्या काळातून आपल्या सगळ्यांना समन्वयाने एकमेकांच्या सहकार्याने यशस्वीरित्या बाहेर पडायचे आहे. शासन शेतकर्यांच्या पाठीशी असून जिल्ह्यात पूरेशा खताचा, बी-बियाणांचा साठा उपलब्ध आहे. त्याचे योग्य नियोजन करुन शेतक-यांना तो सुलभतेने सुरक्षितरित्या उपलब्ध करुन द्यावा, असे श्री. देसाई यांनी संबंधितांना सांगितले.
फलोत्पादन मंत्री श्री.भूमरे यांनी पालकमंत्री रस्त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल.तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतंर्गत तसेच इतर योजनांतर्गत लाभ देण्यासाठी योग्य ते नियोजन लवकरच करण्यात येईल, असे लोकप्रतिनिधींद्वारे प्राप्त सूचनाबाबत बोलताना सांगितले.