# औरंगाबादच्या विद्यापीठ परिसरातील कोविड संशोधन केंद्राची पालकमंत्र्यांकडून पाहणी.

 

औरंगाबाद:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील कोविड-19 या विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्याकरिता यावर संशोधन होणे गरजेचे असल्याने या संशोधन कार्यात हे ‘कोविड-19 संशोधन केंद्र’ नक्कीच मोलाचे काम करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात कोविड-19 संशोधन केंद्र (Covid-19 Testing & Research Facility Center) ला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन इमारतीची पाहणी केली. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, डीएनए बारकोडींगचे संचालक डॉ.जी.एस.खेडकर आदींची उपस्थिती होती.

एमआयडीसीतील ऑरिक सिटी यांच्यामार्फत सीएसआर फंडातून हा 1 कोटी 23 लाख रुपयाचा निधी संचालक मंडळाकडून मंजूर करुन कोविड संशोधन केंद्र तातडीने उभे केल्याबद्दल समाधान व्यक्त करत श्री. देसाई म्हणाले की, भविष्यातील कोविड-19 चा प्रसार रोखण्याकरिता हे संशोधन केंद्र काम करणार असून या कोरोना युध्दात अनेक कोरोनायोध्दे जसे की, डॉक्टर, पोलीस आणि नर्स हे स्वत:च्या जिवावर उदार होऊन प्रतिकुल परिस्थितीत काम करित आहेत आणि या कोरोना योध्यांना काम करत असताना विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा आपण हा संसर्ग कसा होतो? आणि त्याचा प्रसार होण्यास कसा अटकाव करता येईल, याकरिता या संशोधन केंद्रात संशोधन करुन संशोधन केंद्राच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याने लवकरात लवकर संशोधन केंद्राचे काम सुरू करण्याचे निर्देशही संबंधितांना यावेळी श्री.देसाई यांनी दिले.

सुरूवातीला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी संशोधन केंद्राच्या इमारतीविषयी माहिती देताना सांगितले की, कोविड-19 विषाणूच्या संशोधनाकरिता हे केंद्र राज्यातील तिसरे केंद्र असून या संशोधन केंद्रांत सध्या 23 कर्मचाऱ्यांचा स्टाफ असून येथे दररोज 1 हजारपर्यंत स्वॅब तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. तसेच येथील मशिनरी अधिक अद्ययावत करण्याकरिता देखील प्रयत्न चालू आहे. तसेच उस्मानाबाद येथे चौथ्या संशोधन केंद्राचे काम प्रगतीपथावर असून त्याकरिता सीएसआर फंडातून निधी देखील मिळाला आहे.  आवश्यक साधनसामुग्री लवकरच उपलब्ध करुन तेथेही काम सुरू होणार आहे.

दरम्यान, डीएनए बारकोडींगचे संचालक डॉ.जी.एस.खेडकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे संशोधन केंद्रात होणाऱ्या संशोधनाची सविस्तर माहिती दिली. यावेळी कुलगुरू डॉ.येवले यांनी पालकमंत्री श्री.देसाई यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 35 लाख रुपये व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीतील एकूण रक्कम 9 लाख 26 हजार 100 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *