औरंगाबाद: महावितरण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद सहव्यवस्थापकीय संचालकपदी असलेले सुनील चव्हाण यांनी आज प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील सुनील चव्हाण यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून मृद आणि व्यवस्थापन या विषयातून विशेष प्राविण्यासह एमएससी पूर्ण केले आहे. त्यांनी मंत्रालय मुंबई येथे उपसचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. तसेच ठाणे महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून देखील साडेतीन वर्ष काम पाहिले आहे. यावेळी ठाणे महापालिकेत स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम करताना पाच हजार 500 कोटी रूपयांचा अर्थसंकल्पाचा मसुदा तयार करून 150 पेक्षा जास्त योजना राबविल्या आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त म्हणून 18 हजारांपेक्षा जास्त बेकादेशीर व अवैध बांधकामांवर कार्यवाही केली आहे. यामुळे दोन हजार 500 कोटी किंमतीची 75 हेक्टर जमीन नागरी सुविधांसाठी उपलब्ध झाली. प्रस्तुत विषयाचे सादरीकरण राष्ट्रपती यांना 4 ऑगस्ट 2017 रोजी करण्यात आले असून या संदर्भातील चित्रफित युट्युबवर उपलब्ध आहे.
ठाणे येथे सन 2015-18 या कालावधीत 5 लाख वृक्ष लागवड (ग्रिनिंग अप ठाणे अंतर्गत) व संवर्धन केले. तसेच महिला, बालक व विशेष कौशल्य असणाऱ्या व्यक्तींसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी, निराश्रित मुलांच्या शिक्षणासाठी सिग्नल शाळा प्रस्थापित केल्या तसेच दूरशिक्षण व्हर्च्युअल वर्ग सुरू केले, स्तनपान कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठी हिरकणी योजनेच्या अंमलबजावणीत पुढाकार घेतला. लातूर भूकंप पीडित बीपीएल लाभार्थ्यांच्या पुनर्वसन कार्यात सक्रिय सहभाग आदींसह स्वच्छता, रोजगार, पर्यावरण, निवडणूक, आरोग्य आदी क्षेत्रात भरीव व यशस्वी कार्य केले. जळगाव, नाशिक, नवी मुंबई, मुंबई, पालघर आणि ठाण्यात त्यांनी विविध पदांवर कार्य केलेले आहे. अतिरिक्त आयुक्त ठाणे मनपा, जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि सहव्यवस्थापकीय संचालक महावितरण, औरंगाबाद यापदी कार्य केलेले आहे.