पुणे: तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज मंगळवार, 8 डिसेंबर रोजी पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्याला राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह देशभरातील 18 विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. सकाळी 8 वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे.
कृषी हा विषय राज्यघटनेत अनुच्छेद 246 अंतर्गत 7 व्या सूचित समावेश असल्यामुळे हा विषय राज्याच्या अखत्यारित येतो. तो राज्य सूचित 14 व्या स्थानावर आहे. मात्र, केंद्र सरकारने राज्य वा शेतकऱ्यांशी चर्चा न करताच शेतकरी विरोधी तीन नवीन कृषी कायदे संसदेत संमत करून घेतले. या कायद्यानुसार कॉर्पोरेट क्षेत्र व भांडवलदारांना फायदा होईल, असे समस्त शेतकरी संघटना व स्वतंत्र मजदूर युनियनचे मत आहे. यासंदर्भात स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आजच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. तसेच कामगार विरोधी कायदे व वीज वितरणाचे संपूर्ण खाजगीकरण करणाऱ्या नवीन वीज बिल 2020 या यालाही विरोध केला आहे.
मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना काळ्या फिती लावून काम करणार: दरम्यान, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेनेही आजच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. तसेच नवीन वीज बिल संशोधन व नवीन कामगार विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून काम करणार असल्याची माहिती मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके यांनी दिली.
यासंदर्भात संघटनेचे सरचिटणीस प्रेमानंद मोर्य यांनी वीज वितरण कंपनी, वीज पारेषण कंपनी व वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना सविस्तर निवेदन देऊन नवीन वीज बिल 2020 नुसार उर्जा क्षेत्राचे संपूर्ण खाजगीकरण करण्यास विरोध केला आहे. खाजगीकरणामुळे मागासवर्गीयांच्या रोजगार व त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलतींवर गंभीर परिणाम होणार आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.