नवी दिल्ली: १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी नोटीस बजावली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. तसेच ठाकरे गटाच्या सर्व आक्षेपांना उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच न्यायालयाने दिले आहेत.
सुनील प्रभू यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात देवदत्त कामत हे हजर होते. यावेळी ठाकरे गटाकडून न्यायालयाला सांगण्यात आले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षाकडून कोणतीही हालचाल होत नाही. विधानसभा अध्यक्षांना ३ वेळेस या बाबत सुनावणी करण्याची विनंती करण्यात आली पण त्यांनी या प्रकरणी पक्षपातीपणा दाखवला, असे ठाकरे गटाने न्यायालयात सांगितले. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणी नोटीस बजावली.