नवी दिल्ली: मोदी आडनाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना मोठा दिलासा देताना गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करून शिक्षेला स्थगिती दिली आहे. आता राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व बहाल होणार आहे. अपील प्रलंबित असलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राहुल गांधींना जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने म्हटले की, ट्रायल कोर्टाने पूर्ण दोन वर्षांची शिक्षा का दिली, याचे कारण दिले नाही. उच्च न्यायालयानेही त्याचा पूर्ण विचार केला नाही. राहुल गांधींचे वक्तव्य योग्य नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सार्वजनिक जीवनात याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
हायकोर्टाचा निर्णय अतिशय रोचक असल्याचे कोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे. या निर्णयात खासदाराने कसे वागले पाहिजे हे सांगण्यात आले आहे. न्यायालयात सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी उपस्थित होते. तर दुसऱ्या बाजूने महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.