सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात म्हणणे आले अंगलट; बंडातात्या अटकेत

साताराः  राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करताना ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी ‘नको ते किर्तन’ करत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे. पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारू पितात. बंडातात्या खोटे बोलतो, असे त्यांनी म्हणावे आणि आमचे आव्हान स्वीकारावे, आम्ही ते सिद्ध करून दाखवू, असे बंडातात्या म्हणाले. मात्र, हे विधान अंगलट येण्याची चिन्हे दिसतात त्यांनी सपशेल माफी मागितली आहे.

दरम्यान, राज्यातील महिला नेत्यांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणारे किर्तनकार प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. विनापरवाना जमाव जमवून आंदोलन आणि महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बंडातात्या कराडकर यांनी दंडवत दंडुका आंदोलनाद्वारे राज्य सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध केला. या आंदोलनावेळी बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली. पतंगराव कदम यांच्या मुलाचे निधन कसे झाले होते विचारा? राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची मुले दारू पितात. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारू पित नाही, त्याचे नाव सांगा. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात. आपण ज्यांची नावे घेतली आहेत, त्यांनी पुरावा मागितला तर ते सिद्ध करू शकतो. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटे बोलत आहेत हे सांगावे, असे आव्हानही बंडातात्यांनी दिले.

बंडातात्या यांनी उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत. मात्र, ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असा उल्लेख भाषणात केला होता. त्यावर पत्रकारांशी बोलताना ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही, पण गुण लागला अशी शेतकऱ्यांची म्हण आहे, असेही बंडातात्या म्हणाले होते. यावेळी ढवळा कोण आणि पोवळा कोण? असे विचारले असता त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि अजित पवार म्हणजे ढोवळा आहेत. अजित पवारांनीच उद्धव ठाकरेंना दारू विकण्याचा गुण लावला असल्याचेही ते म्हणाले होते.

बंडातात्या यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात वादंग निर्माण झाले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सातारा पोलिसांना बंडातात्या यांच्याविरुद्ध कडक कारवाई करून याचा अहवाल ४८ तासांच्या आत आयोगास सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे कराडकर यांच्या अडचणी वाढणार हे स्पष्टच दिसत होते. दरम्यान, सातारा पोलिसांनी बंडातात्याविरुद्ध बेकायदा जमाव जमवणे आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. आता बंडातात्या यांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. महिला नेत्यांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बंडातात्याविरुद्ध कुणी तक्रार केल्यास त्यासंदर्भातही गुन्हा दाखल केला जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आपल्या बेताल वक्तव्यामुळे वादंग वाढून अडचणीत सापडल्याची जाणीव झाल्यानंतर बंडातात्या कराडकर यांनी नमते घेत सपशेल माफी मागितली आहे. ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधला. त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल तर मी  माफी मागतो. माफी मागण्यात कमीपणा कसला? पत्रकारांनी माझ्या वक्तव्याचे भांडवल केले. पत्रकारांनी हा विषय आता वाढवू नये, असे बंडातात्या कराडकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमकः दरम्यान, महिला नेत्यांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बंडातात्या कराडकरविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही तर खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. तसेच राज्यभर आंदोलनाचा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे.

बीड मध्येही भाजपाचे आंदोलन: दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बंडातात्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बीडमध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बीडच्या पेठ बीड पोलिस ठाण्यात बंडातात्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत बंडातात्याविरोधात गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, असा पवित्रा बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतला.

बंडातात्यासह १२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल: राज्य सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि वॉक इन स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या विरोधात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे दारू पितात. राज्यातील नेते आणि त्यांची मुले दारू पिऊन रस्त्यावर पडतात. कुणी आव्हान दिलेच तर ते पुराव्यानिशी सिद्ध करण्याची आमची तयारी आहे, असे बंडातात्या म्हणाले होते.

या आंदोलनादरम्यान साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड गर्दी जमली होती. त्या सर्वांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकऱणी पोलिसांनी प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडातात्या कराडकर, विकास शंकर जवळे, मनोज निंबाळकर यांच्यासह १२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

बंडातात्यांच्या या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाले आणि त्यांच्या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर त्यांनी सपशेल माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र सातारा पोलिसांनी त्यांना विनापरवाना गर्दी जमवून आंदोलन करणे आणि महिला नेत्यांविरुद्ध प्रक्षोभक विधाने केल्याबद्दल आज सकाळी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्यांना फलटण तालुक्यातील पिपरंद येथील राष्ट्रसंत गुरूवर्य दीक्षित आश्रमातून ताब्यात घेऊन साताऱ्यात आणले होते. सातारा शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या अटकेची प्रक्रिया करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

बंडातात्या संस्काराप्रमाणे बोलत आहेत…: बंडातात्या यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली आहे. एका किर्तनकाराच्या तोंडी अशी भाषा येणे म्हणजे तो किर्तनकार आहे की नाही हाच प्रश्न उभा राहतो. बंडातात्या कराडकर यांची मूळे कुठे आहेत, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ते त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलले. यात मनावर घेण्यासारखे काही नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. पंकजाताई असो की सुप्रियाताई असो… एका किर्तनकाराने महिलांवर घसरावे ही महाराष्ट्राची आणि वारकऱ्यांची संस्कृती नाही. त्यामुळे ते खरे किर्तनकार आहेत की नाही हे तपासून पाहण्याची फार पूर्वीपासूनच गरज होती. ते कोण आहेत हे त्यांनी आता त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून महाराष्ट्राला सिद्ध करून दाखवले, असेही आव्हाड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *