नांदेड: मराठवाड्यातील नांदेड-हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणातील मोठं प्रस्थ असलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सूर्यकांता पाटील या शरद पवार यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. असे असले तरी त्या राजकारणापासून अलिप्त राहिल्या. बुधवारी रात्री त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे समाजमाध्यमाव्दारे जाहीर केले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रखर वक्त्या व मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी राजकारणात येण्यापूर्वी पत्रकारितेत अनेक वर्षे काम केले. त्यानंतर त्या नांदेड नगरपालिकेच्या निवडणुकीत जनसंघाच्या तिकिटावर निवडून आल्या. हदगाव विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढताना त्यांनी स्व. बापूराव पाटील आष्टीकर यांचा पराभव केला. त्यानंतर त्या नांदेड व हिंगोली या दोन्ही मतदारसंघातून खासदार राहिल्या व पुढे केंद्रीयमंत्री झाल्या.
युपीए सरकारमध्ये सन 2004 ते 2009 या पाच वर्षांच्या काळात केंद्रात त्यांनी विविध खात्याच्या राज्यमंत्री म्हणून काम केले. शरद पवार यांच्या कट्टर समर्थक व पक्षातील वजनदार नेत्या म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. परंतु सन 2014 मध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. तेव्हापासून त्या पक्षावर नाराज होत्या. मागच्या वेळी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु त्या कधीही पक्षात स्थिरावल्या नाहीत. पक्षानेही त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही. कदाचित अशी खंत ही त्यांच्या मनात असावी, त्यामुळे यापुढे राजकारणच नको या भूमिकेतून त्यांनी राजकरणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय असावा.
काय म्हणाल्या सूर्यकांता पाटील…
आता थांबावे असे वाटत नाही । ना किसींसे दोस्ती ना किसींसे बैर.., खूप प्रेम मिळाले जळणारे होते पण प्रेम करणार्यांची संख्या अधिक होती. मला ते सर्व मिळाले जे एक सामाजिक जीवनात असणार्या व्यक्तीला मिळायला हवे. 43 वर्ष राजकारणात होते एखाद्या राजकुमारीसारखी राहिले 400 रुपयांची साडी 4000 हजाराच्या थाटात नेसली, मिळालेले काम मन लावून केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अशा अनोख्या प्रांतात माझ्यासारखी मनस्वी रमू शकत नाही…राजीनामा लिहून तयार होता पण मी आहेच कोण म्हणून एवढा शो करायचा, सगळ्यांनीच प्रेम दिले सन्मान दिला काहीच तक्रार नाही, आपलीच लायकी नाही हे समजले होते. रागात घेतलेले निर्णय असेच असतात ते योग्य की अयोग्य हे सारासार बुद्धीला जेव्हा ठरविता येत नाही तिथे तोंडाला नवा रंग लावून विचार बदलत नाहीत, हे पक्कं समजलंय. त्यामुळे धाकटे लोक राजकारण सोडतो म्हणत असताना मला आता काय मिळवायचे आहे. एकटीने सगळं जिंकलं लोकांना कंटाळा येईपर्यंत प्रवास करायची माझी तयारी नाही, ज्यांच्यासाठी काम केलं त्यानी सन्मानही केला आणि आज जे नाहीच आहेत त्यांच्या आठवणी मनात आहेत.. आपण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो याची खंत आहे. पण माझा निस्वार्थ प्रवास मला फार समृद्ध करून गेला. जेव्हा लिहायचे तेव्हा लिहिलं पण आज मी माझा राजकीय प्रवास थांबवत आहे. या पुढे नव्या पिढीसाठी काम करीन, घरी बसणार नाही, बसून कुरवाळण्याएवढे काही नाही माझ्या जवळ. विचारांची शिदोरी घेऊन आज मी माझे राजकारण थांबवत आहे.., सगळ्या सहप्रवासी सहकार्यांचे हार्दिक आभार…मी आहे कधीही या घरी आणि मी तुमचीच आहे…
नमस्कार सगळ्यांना थांबते…