# कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या संगोपनासाठी कृतीदल.

पुणे: कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा बालकांची माहिती नागरिकांनी 1098 या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी केले आहे. दरम्यान, अशा बालकांचे यथायोग्य संगोपन व उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर कृतीदल (Task Force) गठीत करण्यात आला आहे.

कोव्हिड-19 मुळे दोन्ही पालक गमविलेल्या बालकांच्या संबंधी सुरक्षितेबाबत व दोन्ही पालक गमविलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन व उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर कृतीदल (Task Force) गठीत करण्यात आला आहे. या कृती दलाची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे. यावेळी ते बोलत होत्या. या बैठकीला पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व यांच्यासह स्वयंमसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची तपशिलवार माहिती उपलब्ध करुन घ्यावी, अशा सूचना करुन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.कटारे पुढे म्हणाल्या, दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि बाल कल्याण समिती यांच्यामार्फत त्यांचे आर्थिक व मालमत्ता विषयक तसेच कायदेविषयक हक्क मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी. या बालकांना आवश्यकतेनुसार बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात यावा. या बालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करावी व दत्तक प्रक्रियेची आवश्यकता असल्यास प्रचलित मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.

पोलीस उपायुक्त श्री. घट्टे म्हणाले, कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालके बालगुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाणार नाहीत, अशा बालकांचे शोषण होणार नाही, बालकामगार म्हणून त्यांची आस्थापनेवर नेमणूक होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल तसेच असे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर आवश्यक ती पोलीस विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *