पुणे: दीक्षित डायटचे अनुसरण केल्याने अनेकांचे मधुमेहाचे विकार कमी झाल्याचे समोर आले आहे. कोरोनातील लॉकडाऊनमध्ये ही या डायटचा अभ्यास केलेला असून त्यामध्ये ही डायट नागरिकांच्या फायद्याचाच राहिला असल्याचे समोर आले आहे. हे शास्त्रीय दृष्ट्या अद्याप अभ्यास केला गेला नसला तरी एकत्रित पाहणीतून दिसून आल्याचे दीक्षित पॅटर्न नावाने प्रसिध्द असलेले आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितले. दरम्यान, दीक्षित डायट पॅटर्न सुरू केल्यानंतर अनेकांची सहा महिन्यातच शुगर लेवल 400 ते 500 वरुन 100 च्या खाली आली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. डॉ. दीक्षित पुढे म्हणाले की, 1997 पासून डॉ.श्रीकांत जिचकर हे व्याख्यानाच्या माध्यमातून ही भूमिका सर्वांसमोर मांडत आहेत. 2012 मध्ये मी त्यांचे यु टयुबवर व्याख्यान ऐकल्यानंतर माझ्यामध्ये ही तेव्हापासूनच बदल झाला. मी सुरुवातीला प्रयोग केला आणि त्यात यश आल्यानंतर तीच भूमिका मी सर्वांसमोर मांडत गेलो आहे. वेद, आयुर्वेद, महाभारत यामध्ये ही दोन वेळच्या जेवणाबाबत सांगण्यात आलेले आहे. दीक्षित पॅटर्न सुरु केल्यानंतर अनेकांची सहा महिन्यातच शुगर 400 ते 500 वरुन 100 च्या खाली आली असल्याचे निरीक्षणातून दिसून आले आहे. दीक्षित पॅटर्न हा शास्त्रीय आधारावर असून त्यामध्ये मधुमेहाबरोबरच अॅसिडीटीसह इतर आजाराला ही महत्त्वपूर्ण ठरले आहे. प्रत्येकाने औषधापासून मुक्तीचे तंत्र पाळले तर नक्कीच हा उपाय यशस्वी ठरेल. प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे काळाची गरज असल्याचे ही डॉ.दीक्षित यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे आभार संघाचे उपाध्यक्ष सुकृत मोकाशी यांनी मानले.