जालना: शहरालगत असलेल्या
पानशेंद्र्यात तरुणाचा जमावाने काठ्या, कुऱ्हाडी आणि लोखंडी सळ्यांनी हल्ला करून निर्घृण खून केला आहे. या घटनेत अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोळ्याच्या दिवशी झालेल्या वादातून आज शुक्रवारी सकाळी ही थरारक घटना घडली आहे. जालना शहरापासून जवळच असलेल्या पानशेंद्रा गावात पोळ्याच्या दिवशी राहूल गौतम बोर्डे आणि गावातील काहीजण यांचा वाद होऊन हाणामारी झाली होती. त्याप्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आज सकाळी राहूल बोर्डे (25) आणि त्याचा भाऊ प्रदीप बोर्डे (23) या दोघा भावांना 10 ते 15 जणांच्या जमावाने हेरून त्यांच्यावर काठ्या, कुऱ्हाडी आणि लोखंडी सळ्यांनी हल्ला केला. यामध्ये राहूल बोर्डे हा जागीच ठार झाला. तर प्रदीप हा गंभीर जखमी झाला आहे. मयत व जखमीला जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झालेला आहे. संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.