मुंबई: बचत खात्यांच्या व्याजदरातील कपात मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ‘एप्रिल फूल’ पण असू शकतो, असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.
केंद्र सरकारने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय बुधवारी घेतला होता. गुरूवारी त्यासंदर्भातील वृत्त सर्वच वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले होते. परंतु, गुरूवारी सकाळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ट्वीट करून हा निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. परंतु, केंद्राच्या या निर्णयावर चव्हाण यांनी शंका व्यक्त केली आहे. व्याजदर कपातीचा निर्णय नजरचुकीने वगैरे घेण्यात आलेला नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय मागे घेण्यात आला असावा. परंतु, आज १ एप्रिल आहे. हे ‘एप्रिल फूल’ पण असू शकते. निवडणूक संपल्यावर कदाचित आज मागे घेतलेला निर्णय पुन्हा लागू केला जाऊ शकतो, असे अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.