औरंगाबाद: कर्जाची फाईल मंजूर करून देण्यासाठी व मंजूर केलेल्या कर्जाची उर्वरित रक्कम बँकेतून तक्रारदार यांना देण्यासाठी सव्वा लाख रुपयांची लाच घेताना लोकविकास नागरी सहकारी बँक मर्यादित औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष व अकाऊंटंट यांना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे.
जगन्नाथ खंडेराव उर्फ जे. के. जाधव (वय 70, लोकविकास बँकेचे अध्यक्ष) व आत्माराम संतराम पवार (वय 52 अकाऊंटंट रा. मयूर पार्क, औरंगाबाद) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 31 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती.
तक्रारदार यांची फाईल मंजूर करण्यासाठी व मंजूर केलेल्या कर्जाची उर्वरित रक्कम बँकेतून तक्रारदार यांना देण्यासाठी लोकविकास बँकेचे अध्यक्ष जाधव यांनी 1 लाख 25 हजार रुपयांची मागणी केली व ती लाचेची रक्कम अकाऊंटंट पवार यांच्याकडे देण्यास सांगितले. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून आरोपी आत्माराम पवार यांना सव्वालाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाडगे, पोलीस निरीक्षक संदीप राजपूत यांच्यासह पोलीस कर्मचारी बाळासाहेब राठोड, संतोष जोशी, केवल घुसिंगे, राजेंद्र सिनकर यांनी केली.