पुणे: कला आत्मसात केल्यानंतर नृत्याच्या स्वनिर्मितीसाठी ताल, बोल आणि त्याचे गणित समजायला, यायलाच हवे. रंगमंचीय नृत्याचा अविष्कार करताना भौमितिक संकल्पनाही सादर करता येतात, त्यासाठी आपल्या गणिती ज्ञानाचा संयोग करून शास्त्रशुद्ध रचना करता येऊ शकतात, असे मत नृत्यांगना सई लेले- परांजपे यांनी व्यक्त केले.
मॅप एपिक कम्युनिकेशन प्रा.लि.च्या ‘अंकनाद’ या गणितविषयक गोडी निर्माण करणाऱ्या ऍप द्वारे ‘नृत्यमय गणित’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या वेबिनारमध्ये सई लेले- परांजपे यांनी मार्गदर्शन केले.
प्रत्येक गोष्ट सुंदर असतेच ती त्याच सौंदर्यातून दाखवता आली पाहिजे. आखीव रेखीव नृत्य हालचाली या भौमितिक संकल्पना सहजतेने स्टेजवर साकारल्या जाऊ शकतात, असे सांगून सई लेले- परांजपे यांनी पाढ्यांची नृत्यामध्ये मदत होते, त्यातही मातृभाषेत पाढे पाठ केले तर त्याचा फायदा नृत्य रचना करताना होतो, असेही सांगितले. नृत्यातील संरचना करण्यासाठी पाढे मदत करतात. महत्त्वाचे म्हणजे नृत्यातली गिनती करणे सोपे जाते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रत्येक रेषेला जीव असो. तो नृत्यातून सादर करता आले पाहिजे. उभी असेल फोर्स, आडवी शांत, नागमोडी असणे म्हणजे वेग. नृत्यातील हातवारे हेच असतात. रंगमंचावरील चित्र आपण नृत्यातून निर्माण करतो असेही त्या म्हणाल्या.
दोन दिवसांच्या वेबिनारच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी नृत्यांगना सई लेले-परांजपे यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार, 10 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नृत्यगुरु डॉ.सुचेता भिडे-चापेकर यांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक सल्लागार प्राची साठे यांनी दोन्ही दिवसांच्या चर्चेचे संचालन केले. पराग गाडगीळ, मंदार नामजोशी, निर्मिती नामजोशी, समीर बापट यांच्यासह ‘गणितालय’ चे सदस्य विद्यार्थी या वेबिनार मध्ये सहभागी झाले.
अंकनादच्या अॅपबाबत अनेक पालकांची इंग्रजीतून नादमय टेबल्सही उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी होती कारण मुले इंग्रजी माध्यमात शिकतात. त्यासाठीच मॅपने 2 ते 30 पर्यंतचे टेबल्स इंग्रजीतून नादमय पद्धतीने उपलब्ध करून दिले आहेत. त्याची घोषणा पराग गाडगीळ यांनी केली. त्यामुळे इंग्रजी माध्यमातील मुलेही या अॅपच्या मदतीने टेबल्स नादमय पद्धतीने म्हणून शकतील. लहान मुलांसाठी 1 ते 100 चे स्पेलिंग देखील नादमय पद्धतीने समाविष्ट करण्यात आले आहेत. हिंदीमधूनही पाढे या अॅपमध्ये समाविष्ट करण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. त्याव्यतिरिक्त मॅप पाढे पाठांतर स्पर्धा आणि अपूर्णांक पाठांतर स्पर्धा ही एक आगळी स्पर्धा आयोजित करते आहे. शालेय जीवनात या पाढ्यांचा वापर वाढवण्यासाठी ही स्पर्धा आहे. लवकरच त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल.