नांदेड: सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून माजी पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांनी काम केले. देशामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग वाढवून रोजगार निर्मिती केली. देश आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण व्हावा ही संकल्पना पंडित जवाहरलाल नेहरु यांचीच होती, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
येथील कुसुम सभागृहात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमास माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे, माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जि.प.च्या अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, उपमहापौर मसूद खान, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा आदी उपस्थित होते.
पं.जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभ भाई पटेल, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी अथक प्रयत्न करुन बलशाली भारत बनविण्यात मुख्य भूमिका वठवली. त्यांनी स्वातंत्र्यासाठी व त्यानंतर देशातील सामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून काम केले. परंतु सध्याचे भाजप सरकार सामान्य माणसांसाठी नव्हे तर मुठभर धनदांडग्यांसाठी काम करीत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठीचे व्यवस्थापन भाजपा करत आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या महापुरुषांचा इतिहास पुसण्याचे पाप या सरकारकडून होत आहे. जरी भाजपाने हा प्रयत्न सुरु ठेवला तरी हा इतिहास पुसला जाऊ शकत नाही. मात्र, असा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला. यावेळी अॅड.राज कुलकर्णी यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.पी.सावंत यांनी केले. तर आभार जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी मानले.