भारतीय हवामान विभागाचा मासिक अंदाज
पुणे: मॉन्सूनच्या जुलै महिन्यातील हंगामात 94 ते 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यत आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला. तर राज्याच्या विचार करता अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कमी राहणार असून, दुसर्या आठवड्याच्या अखेरीस पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जुलै महिन्यातील मान्सूनच्या पावसाचा अंदाज जाहीर केला. भारतीय हवामान विभागाने यंदा प्रथमच दर महिन्याचा पावसाचा अंदाज जाहीर करण्यास सुरूवात केली. त्याप्रमाणे हा दुसरा अंदाज आहे.
जुलै महिन्याच्या अंदाजानुसार देशभरात 94 ते 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून, वायव्य भारतातील राज्यांसह, दक्षिण भारत, पूर्व भारताच्या काही भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी ते सरासरी इतके राहणार आहे. तर मध्य भारताचा काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
राज्यात कमी पाऊस
महाराष्ट्राचा विचार करता जुलै महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विदर्भाच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी ते सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भाच्या काही भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
अल निनो सर्वसामान्य राहणार
विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसामान्य अल निनो स्थिती आहे. मान्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मान्सून हंगामात ही स्थिती कायम राहणार आहे. त्यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (भारतीय समुद्री स्थिरांक) सर्वसामान्य आहे.