# केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ; आता डीए 28 वरून 31 टक्क्यांवर.

नवी दिल्ली: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (डीए) 3% ने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीसह DA 31% झाला आहे. एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होईल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली.

डीए वाढवण्याच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘औद्योगिक कामासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे डीए निश्चित केला जातो. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून 3% ने वाढवला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारचे 47 लाख 14 हजार कर्मचारी आणि 68 लाख 62 हजार पेन्शनधारकांना फायदा होईल. यामुळे सरकारला वार्षिक 9,488.70 कोटी रुपये खर्च येणार आहे.

सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता (डीए) दर साधारणपणे दरवर्षी दोनदा वाढवला जातो. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत डीए दरात वाढ अपेक्षित होती. सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या त्यांच्या मूळ वेतनाच्या 28% डीए म्हणून मिळतात. या दरवाढीनंतर महागाई भत्ता 31% वर गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *