सलग ३३व्या वर्षी परंपरा कायम; प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतीक मंडळाच्या वतीने रूग्णांना दीपावली फराळ वाटप
अंबाजोगाई: शहरातील प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक आणि व्यायाम मंडळाने सलग ३३ व्या वर्षी स्वा. रा. ती. मधील रुग्णांना दीपावली निमित्ताने फराळाचे वाटप करण्यात आले. गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथील रूग्णांना प्रियदर्शनी सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक तथा नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिवाळी फराळ वाटप केला.
गेल्या ३३ वर्षांपासून अखंडपणे स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातील रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिवाळी फराळ वाटपाची परंपरा आहे. रूग्णांची व नातेवाईकांची भावना ही दिवाळी पासून आपण दूर आहोत अशी होवू नये या सामाजिक दायित्वातून ही परंपरा सुरू झालेली आहे. दीपावली निमित्त फराळ वाटपात गेली ३३ वर्ष सातत्य टिकवलेले आहे. राजकिशोर मोदी यांनी १९८९ मध्ये प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतीक व व्यायाम मंडळाची स्थापना केली. तेव्हाच्या सर्व तरूण सहकाऱ्यांनी एकत्र येवून मंडळामार्फत विविध स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन केले. त्या सोबतच रुग्णांसाठी हा दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम सुद्धा सुरू केला. यासोबतच मोदी यांनी रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दीपावली च्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष ऍड विष्णूपंत सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, माजी पंचायत समिती सभापती तानाजी देशमुख, नगरसेवक मनोज लखेरा, कचरू सारडा, डॉ. राजेश इंगोले यांच्यासह कार्यकर्ते व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.