१२ ते २३ सप्टेंबरपर्यंत मोठा पाऊस; पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे विशेष बुलेटीन
पुणे: राज्यात १२ ते २३ सप्टेंबर असा १२ दिवस पाऊस सुरु राहणार आहे. सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहिल, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने याबाबत शुक्रवारी विशेष बुलेटीन प्रसिध्द केले.
देशात मध्यभारत, गुजरात महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात मान्सून जोरदार सक्रिय झाला असून राज्यात कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात १२ ते २३ सप्टेंबर या कालावधित मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने शुक्रवारी विशेष बुलेटीन काढून हा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टी पर्यंत कमी दाबाचा पट्टा तसेच अरबी समुद्रातील कर्नाटक किनारपट्टीवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच उत्तर प्रदेश ते विदर्भापर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने गुरुवारी रात्री पासूनच राज्यात मान्सून सक्रीय झाला असून वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किमी. वाढला आहे.
या भागात यलो अलर्ट:
हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूरसह विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे.