अर्धसत्य सांगून सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न होऊ नये: पाण्डेय

द कश्मीर फाइल्स… एक अर्धसत्य ‘विषयावर  चर्चा; सिनेमाचे मार्केटिंग हे पंतप्रधानाचे काम आहे का ? :डॉ.कुमार सप्तर्षी

पुणे: ‘द कश्मीर फाइल्स… एक अर्धसत्य ‘विषयावर ७ एप्रिल रोजी गांधी भवन कोथरूड येथे चर्चा आयोजित करण्यात आली .’द कश्मीर फाइल्स ‘या फिल्मची सत्य पडताळणी करुन चर्चा करण्यात आली. ‘काश्मीरनामा’, ‘कश्मीर और कश्मीरी पंडित’ आणि ‘उसने गांधी को क्यों मारा’ या आणि अशा अनेक पुस्तकांचे लेखक अशोक कुमार पाण्डेय सहभागी झाले. जांबुवंत मनोहर यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. युवक क्रांती दलाचे संस्थापक  डॉ. कुमार सप्तर्षी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. उर्मिला सप्तर्षी, अरूण खोरे,नीलम पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अशोक कुमार पाण्डेय म्हणाले, ‘काश्मीर बद्दल वाचन कमी असल्याने चित्रपटात मांडलेल्या गोष्टी पहिल्यांदाच मांडल्या आहेत, असे वाटते. ह्रदयनाथ वांच्छू यांच्यासारखे काश्मीरच्या ५ हजार  पंडितांनी काश्मीर सोडले नाही. धैर्याने काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या पंडितांना मागणी, उपोषण करुन आजही मदत मिळालेली नाही.

दिल्लीला नेहमीच काश्मीर खोऱ्यात कठपुतळी सरकार असावे असे वाटत असे. राज्यपालपदावर जगमोहन असताना दोन लोकनियुक्त सरकारे पाडण्यात आली. जनमत दिल्लीच्या विरोधात गेले. पाक पुरस्कृत दहशतवादाचे भारत विरोधी वातावरण उभे राहिल्यावर काश्मीर खोऱ्यात राजकीय हत्या सुरू झाल्या. त्यात उच्चपदस्थ काश्मीरी पंडित होते. साहजिकच हा समुदाय भयग्रस्त झाला.

काश्मीरी पंडितांच्या हत्यांची संख्या कितीही सांगीतले जात असली तरी ती ५ हजारच्या आसपास आहे. सुरुवातीच्या काळात राजकीय असलेल्या या हत्या धार्मिक कारणाने होऊ लागल्या. परंतु, मिरवाईज फारुख यांच्यासहित मुस्लिमांच्याही हत्या झालेल्या आहेत.

काश्मीरी पंडित खोऱ्याबाहेर जात असताना त्यांना रोखण्याचे प्रयत्न जगमोहन, व्ही.पी. सिंह यांच्याकडून झाले नाहीत. उलट काही स्थानिक मुसलमान काश्मीरी लोक पंडितांना वाचवत होते, माहिती पुरवत होते. राजीव गांधी यांनी संसदेला घेराव घातल्यावर खोऱ्यात सेना पाठवण्याचा निर्णय झाला. जगमोहन काळात लोकभावना लक्षात न घेता निर्णय घेतले जात होते.

त्या काळातील अर्धसत्य सांगून सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न होऊ नये. ३ दशके काश्मीर खोऱ्या बाहेर राहणाऱ्या आणि स्थैर्य मिळवलेल्या पंडितांना पुन्हा काश्मीरमध्ये परत जावेसे वाटत नाही. मात्र, पुनर्वसन शिबिरात (ट्रांसिट कँम्पमध्ये) राहणाऱ्या पंडितांना घरी परतण्याची आशा आहे. त्यांना रोजगार, स्थैर्य, सुरक्षिततेचे वातावरण तयार केले पाहिजे. राजकीय संवाद प्रक्रिया सुरू ठेवली पाहिजे. ‘ कश्मीर फाईल्स ‘ चित्रपटाप्रमाणे ‘ ते ‘ आणि ‘ आपण ‘ अशा दोनच दृष्टीकोणातून काश्मीरकडे पाहता कामा नये, त्यातील गुंता समजून घेतला पाहिजे. द्वेष सोडून प्रेमाचा मार्ग स्वीकारला पाहिजे.कलेचा उद्देश सकारात्मकता निर्माण करणे असला पाहिजे. दुरुपयोग होता कामा नये.

सिनेमाचे मार्केटिंग हे पंतप्रधानाचे काम आहे का ? :डॉ.कुमार सप्तर्षी –‘कश्मीर फाईल्स ‘ मधून बीभत्स हिंसा दाखवण्यात आली आहे. मेंदूवर आघात होतो. मुसलमानांबद्दल द्वेष निर्माण करणं हा उद्देश आहे. सिनेमाचे मार्केटिंग हा पंतप्रधानांचे काम आहे का ? सेन्सॉर बोर्डाने म्हणूनच या चित्रपटाला मोकळीक दिली. सज्जन हिंदू चे रूपांतर अंध भक्तात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माणसातील सद्भाव नष्ट करणे हा डाव आहे. आपण संविधानाला मानणारे भारतीयच राहण्याचा निर्धार केला पाहिजे.

गुरुवार, ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे झाला. संयोजन समिती सदस्य संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, सचिन पांडुळे,अप्पा अनारसे, विजय बोडेकर, प्रसाद झावरे, रेश्मा सांबरे, सचिन पांडुळे, अजय नेमाणे, कमलाकर शेटे, नीलम पंडित, सुदर्शन चखाले, रोहन गायकवाड, शाम तोडकर, आदित्य आरेकर, जुबेर चकोली  यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *