पुणेः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांची तब्बल नऊ वर्षांनंतर ओळख पटली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दाभोलकरांच्या खुन्यांना ओळखले. सचिन अनदुरे आणि शरद कळसकर या दोघांनीच दाभोलकरांवर गोळीबार केला आणि ते पळून गेले, अशी साक्ष प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न्यायालयात दिली.
डॉ. दाभोलकर खून खटल्याची सुनावणी विशेष न्यायमूर्ती एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू असून आज या प्रकरणात महत्वाच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी तर डॉ. दाभोलकर कुटुंबीयांच्या वतीने ऍड ओंकार नेवगी यांनी काम पाहिले. बचाव पक्षाच्या वतीने विरेंद्र इचलकरंजीकर हे काम पहात असून या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २३ मार्च रोजी होणार आहे.
२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळच्या सुमारास गोळ्या घालून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी साफसफाई करणारा एक पुरूष आणि महिला त्या पुलाच्या दुभाजकावर बसले होते. त्यावेळी तेथील एका झाडावर माकड आले आणि कावळ्यांचा आवाजही आला. साक्षीदार तिकडे पहात असताना एका व्यक्तीवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर ती व्यक्ती काही क्षणात खाली कोसळली.
गोळ्या झाडून हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूला पळाले. या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेल्या त्या व्यक्तीला पाहिले आणि आम्ही आमच्या साफसफाईच्या कामासाठी निघून गेलो. सचिन अनदुरे आणि शरद कळसकर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या, असे साक्षीदारांनी न्यायालयात दिलेल्या साक्षीत म्हटले आहे.