पुणे: मान्सून शुक्रवारी अंदमान बेटांवर दाखल झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पोषक वातावरणामुळे जोरदार मुसंडी मारली आहे. मान्सूनने संपूर्ण अंदमान, निकोबार बेटांचा समुद्र व्यापला असून, श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, ठरलेल्या वेळेनुसार म्हणजेच 31 मे किंवा 1 जूनच्या सुमारास मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. ही माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यांची निमिर्ती झाली असून, त्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. तर 26 मे रोजी या चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊन ते बंगालच्या उपसागराचा उत्तर भाग, पश्चिम बंगाल बांग्लादेश आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीवर झेपावणार आहे. या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात वाऱ्याचे प्रमाण वाढणार आहे. परिणामी मान्सूनचा प्रवास आणखी वेगाने होणार आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली.
पोषक वातावरणामुळे मान्सून 21 मेच्या आसपास बंगालच्या उपासगरात दाखल झाल्यानंतर लागलीच म्हणजेच दुसऱ्या दिवशीच मान्सूनने संपूर्ण निकोबार बेटांचा समूह व्यापला आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागापर्यंत मजल मारली. त्याचबरोबर श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवरील काही भागात शनिवारी मान्सून दाखल झाला. दरम्यान, ठरलेल्या वेळेनुसार म्हणजेच 31 मे किंवा 1 जूनच्या आसपास मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल.