पुणे: रेंगाळलेला मान्सून पुन्हा एकदा पुढे सरकण्यास सुरूवात झाली आहे. गुरूवारी (दि.16) मान्सूने संपूर्ण मध्यमहाराष्ट्र, संपूर्ण मराठवाडा व्यापला असून विदर्भापर्यंत मजल मारली आहे. दरम्यान, मान्सून सरासरी 15 जूनच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असतो. मात्र, यंदा त्यासाठी 16 जून उजाडावा लागला आहे. 19 जूनपासून राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कोकण आणि घाटमाथा मुसळधार ते अतिमुसळधार तर मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण आहे. मात्र, पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेली स्थिती अद्यापही तयार झाली नाही. येत्या दोन दिवसात अरबी समुद्रातील महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती आणि उत्तर मध्य आणि दक्षिण गुजरात पासून ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेच्या वरच्या भागात चक्रातावत तयार होणार आहे. त्यामुळेच राज्यात कोकणासह, घाटमाथा, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात 26 जूनपर्यंत पाऊस हजेरी लावणार आहे. मात्र, पाऊस पडण्याचे प्रमाण कमी जास्त राहण्याची शक्यता आहे.
राज्याचा बहुतांश भाग मान्सूनने गुरूवारी व्यापला याचबरोबर उत्तर अरबी समुद्र, गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश, तेलंगण (पूर्ण भाग), दक्षिण छ्त्तीसगड (काही भाग), आंध्रप्रदेशची किनारपट्टी, बंगालच्या उपसागरातील पश्चिम मध्य व ईशान्य भाग मान्सूने व्यापला आहे. येत्या दोन दिवसात मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, उर्वरित विदर्भ, आंध्रप्रदेश, बंगालचा उपसागर, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, हिमालयीन भाग, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश या भागात दाखल होण्याची शक्यता आहे.
राज्यात 21 जूनपासून पावसाचा जोर वाढणार: राज्याच्या बहुतांश भागात विशेषत: कोकण, घाटमाथा, या भागात 19 जूनपासून पाऊस पडण्यास सुरूवात होणार आहे. 21 जूनपासून पाऊस चांगला वाढणार आहे. हा पाऊस 26 जूनपर्यंत राहील. मात्र, त्याचे प्रमाण कमी अधिक राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेतील हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केली आहे.