पुणे: देशात रेंगाळलेला मान्सूनचा प्रवास गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू झाला असून, 28 ऑक्टोबर पासून संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरणार आहे. दरम्यान, याच वेळेला दक्षिण भारतातील मान्सून सुरू होणार आहे. दक्षिणेकडील मान्सून तामिळनाडू, आंध्रप्रदेशाची किनारपट्टी, कर्नाटक व केरळ पर्यंत असणार आहे.
देशात गेल्या चार महिन्याहून अधिक काळ मान्सूनने मुक्काम ठोकला आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्यानुसार 28 सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थान पासून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यामुळे महाराष्ट्रासह ईशान्येकडील राज्यामध्ये पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवस थांबला होता. आता मात्र हा प्रवास सुरू झाला असून, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर व मध्य अरबी समुद्र, ओडिशा, मध्यमहाराष्ट्र, या भागातून 48 तासात मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार आहे.
दरम्यान राज्यात शनिवारी देखील मध्यमहाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाने विजांचा कडकडाटात, मेघगर्जनेसह हजेरी लावली आहे. 26 ऑक्टोबर पर्यंत दक्षिण कोकण, मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात मेगर्जनेसह पाऊस पडेल.
या शहरात यलो अलर्ट: नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद
आणखी एक नवीन कमी दाबाचा पट्टा तयार होणार: 29 ऑक्टोबरला बंगालच्या उपसागराच्या मध्यपूर्व भागात आणखी एक नवीन कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडण्यास सुरूवात होणार आहे.