मुंबई: गुढीपाडव्याच्या या शुभमुहुर्तावर आपल्या मातृभाषेच्या मंदिराचे भूमिपूजन करत आहोत. याचा आनंद, समाधान आहे. आयुष्याचे सार्थक झाले अशी ही घटना आहे. मराठी माणूस म्हटला की त्याच्या आयुष्यात संघर्ष आला. ज्या वेळी भाषावार प्रांत रचना झाली. त्यावेळी मुंबईला लढा देऊन ती मिळवावी लागली. हुत्मात्मा स्मारकाचा विस्तार करणार. मुंबईसाठी ज्यांचे आजोबा लढले. मुंबई मिळाल्यानंतर मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचा काम ज्यांनी केले. त्यांच्यासाठी मराठी भवन तयार करण्याची बाब अभिमानची आहे. मराठी भाषा भवन पी. के. दास हे करतात. आपण जे करतो आहोत ते सर्वोत्तम ठरले पाहीजे. मातृभाषेचे भवन जगभरातील सर्वांसाठी आदर्श असे असले पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
मराठी भाषा भवनाचे भूमीपूजन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, राहुल शेवाळे, मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक न चुकता येथे आलाच पाहीजे. मराठीचे सौदर्यं, खजिना यातून दिसला पाहिजे. या राज्यात मराठी बोलण्याचा कायदा करावा लागतो. ही वेळ आपल्यावर का आली. कोणी आणली. मराठी भाषेत बोला. टीका करणारे लोक काय किमतीचे आहेत याला मी महत्व देत नाही. इंग्रजी शाळेमध्ये आणि घरामध्ये मराठी ही शिकवण बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. माझी मराठी मुले इंग्रजी, हिंदीतून बोलतात. मातृभाषेचा न्यूनगंड बाळगता कामा नये.
मराठी भाषा भवनासोबत रंगभूमी देखील उभी राहत आहे. आपण मराठी भाषेची ताकद ओळखू शकत नाही, हे आपले दुर्दवी. आपल्या कारभाराची भाषा सुलभ भाषेत असली पाहीजे. बोली भाषेचे संवर्धन केले पाहिजे. राज्य कारभाराची भाषा स्वभाषा असली पाहिजे. राज्य व्यवहार कोष तयार झाला पाहीजे, भाषा ही संस्कृतीची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची खलिते जायची ती राजभाषा होती. आमची भाषा कोणावर आक्रमण करणारी नको. कर्नाटकात मराठी भाषिकांवर होणार अन्याय चालणार नाही. मराठी कोणावर अत्याचार करत नाही. मराठी शिकली पाहिजे. ती आवश्यकता आहे. पाट्या मराठीतून असल्या पाहिजे. त्याबद्दल पोटदुखी होत असेल तर त्यांचा बंदोबस्त केले पाहिजे. मराठी भाषेचा ठसा पुसण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा बंदोबस्त करण्याची आमची तयारी आहे. मराठी तलवारीसारखी तळपणारी राहिली पाहिजे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.