# भारतातील कोरोनामुक्तांच्या संख्येने ओलांडला 50 लाखांचा टप्पा.

गेल्या 11 दिवसांत 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त; बरे होणारे रूग्ण उपचार घेणाऱ्यांच्या तुलनेत 5 पटींपेक्षा अधिक

नवी दिल्ली: भारतातील कोरोनामुक्तांच्या संख्येने आज 50 लाखांचा महत्त्वाचा टप्पा पार केला (50,16,520). कोविडमधून बरे होणाऱ्या रुग्णांची रोजची संख्या मोठी असल्याने,  कोरोनामुक्त व्यक्तींची दररोज मोठ्या संख्येने नोंद करण्याचा भारताचा शिरस्ता कायम आहे. देशात गेल्या चोवीस तासांत 74,893 रुग्ण कोरोनातून बरे झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोनामुक्तीचे प्रमाण अतिशय उच्च असून, एका दिवसात 90,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याची कामगिरीही भारताने नोंदविली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या उपचार घेणाऱ्यांच्या तुलनेत 5 पटींपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.

रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या दरात होणाऱ्या वाढीचे प्रमाणही सातत्याने वाढत असल्याने, बरे झालेल्यांच्या संख्येत एका महिन्यात जवळपास 100% इतकी वाढ नोंदविली गेली आहे. रुग्ण बरे होण्याचा देशातील दर आणखी वाढून 82.58% इतका झाला आहे.

15 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुक्तीचा दर राष्ट्रीय पातळीवरील सरासरी दरापेक्षा अधिक आहे. नव्याने कोरोनामुक्त झालेल्यांपैकी 73% व्यक्ती, पुढील दहा राज्यांमधील आहेत- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश,  उत्तरप्रदेश, तमिळनाडू, दिल्ली,  केरळ, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि पंजाब. कोरोनातून नव्याने बरे झालेल्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 13,000 इतकी आहे.

जून 2020 मध्ये कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख होती, त्यानंतर हे प्रमाण वेगाने वाढत गेले आहे. गेल्या फक्त 11 दिवसांत 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे झालेल्यांपैकी 78% व्यक्तींची नोंद 10  राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये झालेली दिसते. कोरोनामुक्त व्यक्तींची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात असून त्याखालोखाल आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्येही मोठी संख्या नोंदविली गेली आहे.

गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाचे 82,170 नवे रुग्ण नोंदविले गेले आहेत. या नव्या रुग्णांपैकी 79% रुग्ण दहा राज्यांमध्ये एकवटले गेले आहेत. महाराष्ट्रात 18,000 पेक्षा अधिक, तर कर्नाटकात 9,000 पेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

गेल्या चोवीस तासांत 1,039 व्यक्ती कोरोनामुळे दगावल्या. नव्याने नोंदल्या गेलेल्या या मृत्यूंपैकी 84% मृत्यू, 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदले गेले आहेत. काल नोंदलेल्यापैकी 36% म्हणजे 380 मृत्यू महाराष्ट्रात झाले, तर त्यापाठोपाठ तामिळनाडू आणि कर्नाटकात अनुक्रमे 80 आणि 79 जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *